Bhaum Pradosh 2025: आयुष्य मंगलमयी व्हावेसे वाटत असेल तर भौम प्रदोषाच्या वेळी टाळा 'या' चार चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:22 IST2025-02-24T11:22:12+5:302025-02-24T11:22:27+5:30

Bhaum Pradosh 2025: २५ फेब्रुवारी रोजी भौम प्रदोष आहे, मंगळ ग्रहाची अनुकूलता आणि शिवकृपा प्राप्तीसाठी हे व्रत करताना दिलेल्या चुका टाळा. 

Bhaum Pradosh 2025: If you want your life to be auspicious, avoid these four mistakes during Bhaum Pradosh! | Bhaum Pradosh 2025: आयुष्य मंगलमयी व्हावेसे वाटत असेल तर भौम प्रदोषाच्या वेळी टाळा 'या' चार चुका!

Bhaum Pradosh 2025: आयुष्य मंगलमयी व्हावेसे वाटत असेल तर भौम प्रदोषाच्या वेळी टाळा 'या' चार चुका!

यंदा २४, २५, २६ फेब्रुवारी, असे सलग तीन दिवस शिव उपासनेची संधी मिळाली आहे. २४ ला सोमवार म्हणून, २५ ला भौम प्रदोष म्हणून आणि २६ला महाशिवरात्री (Maha Shivratri 2025) म्हणून शिव उपासना करण्याची संधी मिळाली आहे. सादर लेखात आपण भौम प्रदोषाचे महत्त्व आणि हे व्रत आचरताना टाळावयाच्या चुका याबद्दल जाणून घेऊ. 

आपण आपल्या घरात, शाळेत, महाविद्यालयात, ऑफिसमध्ये जसे ठराविक नियम पाळतो, तसे मंदिराचेही काही नियम पाळणे बंधनकारक असते. मग ते नियम देवपुजेशी संबंधित असो नाहीतर आपल्या पेहरावाशी! या नियमांचा संबंध मंदिराच्या पवित्र वातावरणाशी असतो. म्हणून शक्य तेवढ्या प्रमाणात नियमांचे पालन करून देवपूजा करावी असे धर्म शास्त्र सांगते. २५ फेब्रुवारी रोजी भौम प्रदोष (Bhaum Pradosh 2025) आहे. मंगळवारी येणार्‍या प्रदोष व्रताला भौम प्रदोष म्हटले जाते. प्रदोष व्रताच्या निमित्ताने भगवान शिवाची पूजा केली जाते.  कर्जमुक्ती आणि आर्थिक लाभासाठी हे व्रत केले जाते. 

Maha Shivratri 2025:शिवकृपा हवी असेल तर महाशिवरात्रीला आठवणीने करा 'ही' उपासना!

अभिषेकाचे पाणी घरून न्यावे : शिव अभिषेकाची परंपरा फार जुनी आहे. शिवपिंडीवरील कलशातून शिवाच्या डोक्यावर संतत धार पडावी या हेतून कलशाची रचना केली जाते. त्यानुसार आपणही शिवाभिषेक करताना शंकराच्या पिंडीवर थोडे पाणी घालून उर्वरित पाणी वरील कलशात घालावे. मात्र ते पाणी घरून नेलेले असावे. शिव पूजेला जाताना फुलं, दूध आणि पाणी घरातून घेऊन जाण्याचा प्रघात आहे. एकवेळ फ़ुलं आणि बेल मंदिराबाहेरील फुल विक्रेत्याकडे मिळेलही, परंतु दूध किंवा नुसते पाणी घरूनच घेऊन जावे असे शास्त्र सांगते. तसे करणे हे भगवंताशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्यासारखे आहे. देवासाठी आठवणीने कलशातून किंवा पेल्यातून नेलेले पाणी आपला सच्चा भाव दर्शवते. 

पाण्याचा पेला रिकामा परत आणू नये: दुधामुळे शीवाल्याच्या गाभाऱ्यात वास येतो. म्हणून शास्त्रापुरते थेंबभर दूध आणि बाकीचा अभिषेक पाण्याने करावा. अभिषेकासाठी नेलेले भांडं, फुलपात्र किंवा कलश घरातून नेताना जसा पाण्याने भरून नेतो, तसा मंदिरातून परतताना तो भरून आणावा. मंदिरातून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे आणि ते तीर्थ समजून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे. त्यामुळे घरातील नकारात्मक लहरी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.  

मंदिरात जाण्याचे कपडे : मंदिरात जाताना आपला वेष सात्त्विक असावा. तोकडे कपडे घालून मंदिरात जाऊ नये. मंदिराचे पावित्र्य भंग करू नये. ज्याप्रमाणे शाळेत, कॉलेज मध्ये आपण गणवेश घालतो, तसा धार्मिक स्थळी जाताना नीटनेटके, स्वच्छ धुतलेले कपडे हा गणवेश समजावा. जर सोवळे नेसले असेल तर ते वस्त्र नेसून झोपू नये. ते कपडे बदलावेत आणि साध्या कपड्यांवर इतर दैनंदिन कामे करावीत. 

निर्माल्य : मंदिराचे वातावरण पवित्र ठेवण्यासाठी तिथली स्वच्छता जपण्याची जबाबदारी भाविक म्हणून आपली असते, हे ध्यानात ठेवले पाहिजे. मंदिराबाहेर आपली पादत्राणे अस्ताव्यस्त टाकू नयेत. चिखलाचे पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. पूजेचे निर्माल्य झाडाच्या बुंध्याशी न टाकता निर्माल्य कुंडीतच टाकावे. निर्माल्याचा कुबट वास येत असल्यास मंदिराच्या व्यवस्थापकांच्या कानावर घालावे. 

भगवान शिवाची पूजा ही केवळ शिवलिंगाची पूजा नाही, तर शिवालयाचे आवार स्वच्छ ठेवणे ही देखील शिवपूजा आहे. हे ध्यानात ठेवावे आणि आपल्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपावे. दिलेले नियम पाळले असता भौम प्रदोष व्रताचे सकारात्मक परिणाम अनुभवास येतात.

Web Title: Bhaum Pradosh 2025: If you want your life to be auspicious, avoid these four mistakes during Bhaum Pradosh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.