नागा साधू होणे सोपे नाही, त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:28 IST2023-01-10T16:28:01+5:302023-01-10T16:28:20+5:30
अलीकडच्या काळात लोक प्रसिद्धीसाठी विवस्त्र व्हायला तयार आहेत, मात्र नागा साधू प्रसिद्धी पराङ्मुख राहून अध्यात्मिक उन्नती साधत आहेत!

नागा साधू होणे सोपे नाही, त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, जाणून घ्या!
नागा साधू या शब्दावरूनच अर्थ स्पष्ट होतो, नागा अर्थात नग्न राहणारे साधू! हे लोक तिन्ही ऋतूंमध्ये आयुष्यभर निर्वस्त्र राहतात. आपण त्यांच्याकडे भौतिक जगाच्या नजरेतून पाहत असल्यामुळे त्यांचे नग्न राहणे आपल्या नजरेला खटकत असले तरी, ते लोक शरीर धर्माच्या पलीकडे गेलेले असतात. निर्वस्त्र राहणे हे सर्व संग परित्यागाचे लक्षण आहे. पण हे साधू तसे का करतात? त्यासाठी त्यांना कोणत्या परीक्षांना सामोरे जावे लागते, ते जाणून घेऊ.
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चहा, साखर सोडू शकत नाही, अशात घर, संसार सोडणे जवळपास अशक्य! मात्र वैराग्य स्वीकारलेले हे लोक सर्व संग परित्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात. समाजाला आपल्या निर्वस्त्र असण्याचा त्रास होउ नये म्हणून ते हिमालयासारख्या ठिकाणी किंवा घनदाट जंगलात गुप्तपणे राहतात. केवळ कुंभमेळ्यात सहभागी होतात आणि तिथेही घोळक्याने राहतात आणि समाजाच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने वावरतात. नागा साधू कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. ते अलिप्त राहतात. ते स्वतःला देवाचे दूत मानतात.
नागा साधूंशी संबंधित काही रंजक गोष्टी
१) नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेला सुमारे १२ वर्षे लागतात, ज्यामध्ये ६ वर्षांत ते नागा पंथात सामील होण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करतात. यादरम्यान ते फक्त लंगोट नेसतात. कुंभमेळ्यात नागा साधूंचा कळप जमतो आणि येथे नवस केल्यानंतर ते या लंगोटाचाही त्याग केला जातो.
२. नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. यामध्ये नागा साधूंना प्रथम ब्रह्मचर्य शिकवले जाते. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांना महापुरुषाची दीक्षा दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे पिंडदान करतात, ज्याला बिजवान म्हणतात.
3. नागा साधू झोपण्यासाठी कोणताही पलंग किंवा अंथरूण वापरत नाहीत, तर ते जमिनीवर झोपतात. नागा साधू दिवसातून एकदाच खातात. नागा साधू एका दिवसात फक्त ७ घरातून भिक्षा मागू शकतात. भिक्षा न मिळाल्यास उपाशीपोटी दिवस काढावे लागतात.
४. नागा साधू बनण्याची दीक्षा फक्त शैव आखाड्यात दिली जाते.