'बजरंगबली' हे मारुती रायाचे नाव नाहीच मुळी; जाणून घ्या त्याचे मूळ नाव आणि त्याचा अर्थ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:24 IST2023-01-06T17:24:29+5:302023-01-06T17:24:46+5:30
काही गोष्टी कानगोष्टीसारख्या पसरतात आणि त्याच रूढ होतात, मात्र थोडे कुतूहल जागृत केले तर विषयाच्या मुळाशी पोहोचता येते.

'बजरंगबली' हे मारुती रायाचे नाव नाहीच मुळी; जाणून घ्या त्याचे मूळ नाव आणि त्याचा अर्थ!
अनेकदा बोलीभाषेत दोष निर्माण होऊन कानगोष्टीनुसार गोष्टी पुढे पुढे सांगितल्या जातात आणि कालांतराने त्याच रूढ होत जातात. अशा वेळी पौराणिक संदर्भ पाहणे हिताचे ठरते. आपल्या लाडक्या मारुती रायाला आपण अनेक नावांनी हाक मारतो, जयजयकार करतो, त्यापैकी प्रचलित असलेले एक नाव आहे बजरंगबली. वास्तविक पाहता ते नाव बजरंगबली नसून वज्रान्गबाली असे आहे.
काय आहे त्याचा अर्थ? तर - वज्र - हिरा, अंग- शरीर, बाली- प्रबळ!
हनुमान चालीसामध्ये सुद्धा वर्णन आले आहे,
हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मुंज जनेऊ साजे!
याचा अर्थ ज्याच्या हातात वज्र नावाचे शस्त्र आहे आणि धर्माचा ध्वज आहे! धर्माचा ध्वज कोणीही घेऊन चालत नाही, ते खांदे सक्षम असावे लागतात. त्यासाठी मारुती रायाने व्यायाम करून एवढी सुदृढ शरीरयष्टी कमावली आहे की त्याचे शरीर वज्रासारखे टणक झाले आहे. म्हणून वज्रासारखा कठोर किंवा वज्रासारखे बळ असलेला असे त्याचे वर्णन करता येईल.
हिऱ्याचे तेज लपता लपत नाही, तसे मारुतीरायांच्या भक्तीचे तेज हिऱ्यासारखे झळाळत असते. त्या अर्थानेही ते वज्रान्ग आहेत. मूळ अर्थ हा असला, तरी त्याचा उच्चार बदलत बदलत बजरंगबली हे नाव रूढ झाले आहे. तेच नाव आता आपल्याही ओठी, मनी रुळले आहे. म्हणून उच्चार जरी आपण बजरंगबली असा करत असलो तरी मनात मूळ अर्थ लक्षात ठेवावा म्हणून हा लेखन प्रपंच!