श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आणि त्यांना प्रथेप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी गुरुवारी सायंकाळी शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. या विधींचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जलसमाधी म्हणजे काय? ती कोणाला दिली जाते? का आणि कुठे दिली जाते यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि मनातील शंका दूर करूया.
संतांना जलसमाधी देण्याची परंपरा भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही एक विशेष प्रकारची समाधी आहे, ज्यामध्ये संतांचा मृत देह पाण्यात विसर्जित केले जातो. मात्र हिंदू धर्मात दहन विधीला मान्यता असूनही संतांसाठी हा वेगळा नियम का? तर यामागे आहेत धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे!
मोक्षप्राप्ती : संतमंडळी आपल्याप्रमाणे संसारात, भौतिक सुखात रमणारी नसतात. ते करत असलेली उपासना, तपश्चर्या आणि व्रत ईश्वरप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी करतात. वासना निर्माण न झाल्याने त्यांच्या देहाला विकार आणि विषय चिकटत नाहीत. त्यामुळे त्यांच्या देहाला दहन करण्याची आवश्यकता उरत नाही तर जलसमाधी देऊन आपले निर्जीव शरीर मृत्युपश्चातही इतर जीवांच्या उदर निर्वाहासाठी कामी यावा, या भावनेने त्यांना जलसमाधी दिली जाते, जेणेकरून त्यांना मोक्षप्राप्ती होते.
पंच तत्त्वात विलीन होणे : धार्मिक श्रद्धेनुसार मानवी शरीर पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे. म्हणून हिंदू धर्मातील अंत्य विधी झाल्यानंतर ती व्यक्ती पंचतत्त्वात विलीन झाली असे म्हणतात. संत हे सांसारिक सुखापलीकडे असतात म्हणून जलसमाधी देऊन त्यांनी आपले अवतार कार्य संपवले असे म्हणतात.
संतांचे तपस्वी जीवन : संतमंडळी सांसारिक आसक्तीपासून दूर राहतात. ते कधी कुणाच्या निदर्शनासही येत नाही. विशेषतः कुंभमेळ्यात त्यांचे दर्शन होते. एवढेच नाही तर पहिल्या शाही स्नानाचा मान त्यांना दिला जातो आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेले पाणी स्नानासाठी योग्य मानले जाते.
संतांचा देह जणू पूजनीय मूर्ती : संतांचे शरीर तपश्चर्या, ध्यान आणि दैवी शक्तीने परिपूर्ण असते, ते तेजाने तळपत असते. त्यामुळे त्याच्या पार्थिवावर अग्नीने अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांच्या देहाला पाण्यात विसर्जित करून आत्म्याला शांतता मिळावी अशी प्रार्थना केली जाते.
जलसमाधीची ठिकाणे : धार्मिक मान्यतेनुसार, गंगा, नर्मदा, सरस्वती, गोदावरी या पवित्र नद्यांमध्ये जलसमाधी केली जाते, जेणेकरून संतांची दैवी ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरू शकेल. कोणत्याही स्थानिक नद्यांवर हा विधी केला जाऊ शकत नाही. वरील नद्यांचे विस्तृत पात्र त्यासाठी योग्य मानले जाते.
जलसमाधी देण्यामागे भौगोलिक कारण : पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून संतांचे अंतिम संस्कार अग्नीऐवजी पाण्यातच केले जातात, अशी अनेक मठ आणि आखाड्यांची परंपरा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी संतांना समाधी देण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही त्यामुळेही जलसमाधी दिली जाते.
जलसमाधीचा अधिकार कोणाला? : साधारणपणे, संन्यास घेतलेले साधू, नागा साधू, आखाड्यातील प्रमुख संत किंवा आयुष्यभर तपश्चर्या केलेल्या संन्याशांना जलसमाधी दिली जाते.