भौतिक सुख, विलास, ऐश्वर्य, प्रेम, प्रणय, सौंदर्य आणि कला देणाऱ्या शुक्र ग्रहाची कृपा असेल तर व्यक्तीला राजेशाही जीवन उपभोगता येते. आयुष्यातील विशिष्ट काळात त्याला अमाप संपत्ती, कीर्ती, प्रसिद्धी आणि सर्वसुखाची प्राप्ती होते. तो काळ कोणता आणि आयुष्यात कधी येतो ते पाहू.
वैदिक ज्योतिषशास्त्रात, जीवनातील प्रत्येक गोष्ट नऊ ग्रहांपैकी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे. यामध्ये संपत्ती, सर्व सुविधांनी युक्त विलासी जीवन, भौतिक सुख, प्रेम यांचा समावेश होतो. जेव्हा एखाद्या ग्रहाची महादशा चालू होते तेव्हा त्याचा प्रभाव वाढतो. जाणून घ्या, जास्तीत जास्त २० वर्षे टिकणारी शुक्राची महादशा कोणाला शुभ फल देते.
कुंडलीत शुक्र शुभ योगात असावा :
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र उच्चस्थानी असेल किंवा शुभ स्थान असलेल्या शुभ घरामध्ये स्थित असेल तर अशा व्यक्तीला नेहमी नशिबाची साथ मिळते. विशेषत: जेव्हा शुक्राची महादशा येते तेव्हा व्यक्तीला संपत्ती, उपभोग आणि ऐशोआरामाचा अनुभव येतो आणि चैनीने आयुष्य जगता येते. असे लोक भरपूर पैसा कमावतात आणि सुख-सुविधांनी भरलेले जीवन जगतात. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत, त्यांच्यावर शुक्राची विशेष कृपा असते. इतर राशींना त्यांच्या कुंडलीतील स्थितीनुसार शुक्राची महादशा उपभोगता येते. ती थोडीथोडकी नाही तर वीस वर्ष लाभ देते. जेव्हा अडलेली कामे सुरळीत पार पडू लागतात, लोक आपणहून ओळख वाढवतात, मदत करतात, जोडले जातात, शत्रूवर मात करणे सोपे जाते, तेव्हा आयुष्यात शुक्राची महादशा सुरू झाली असे समजा. त्यासाठी उपाय जाणून घेण्याआधी शुक्राची महादशा कोणाला अशुभ परिणाम देते तेही पाहू.
शुक्र कोणाला अशुभ ठरतो? तर...
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ स्थानी शुक्राचे वास्तव्य असते, त्यांच्यासाठी शुक्राची महादशा खूप कठीण जाते. त्याला अत्यंत गरिबी, आर्थिक टंचाई आणि सुख सोयींपासून वंचित राहावे लागते. मात्र घाबरू नका. ज्योतिष शास्त्राने यावरही उपाय सांगितले आहेत. ते केले असता शुक्राची महादशा महाफल देणारी ठरेल. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
शुक्र महादशा शुभ होण्यासाठी उपाय :
महादशा दरम्यान विविध ग्रहांच्या अंतरदशा देखील होतात. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात काही चढ-उतार येतात. जसे की जर व्यक्तीला अशुभ परिणाम प्राप्त झाले तर त्याला गरिबी, वैवाहिक जीवनातील समस्या, मूल होण्यात अडथळे, लैंगिक रोग इत्यादींचा त्रास होऊ शकतो. हा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी दिलेले उपाय करावेत.
- शुक्राच्या महादशाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांची पूजा करा.- दर शुक्रवारी शुम् शुक्राय नमः मंत्राचा १०८ वेळा जप करा.- शुक्रवारी मुंग्यांना मैदा आणि साखर खाऊ घाला.- दूध, दही, तूप, कापूर या पांढऱ्या वस्तूंचे दान करा.