Ashwin Vinayak Chaturthi September 2025: भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. पुढे परंपरा, कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे गणपती सेवा केली जाते. यानंतर येणारी अश्विन महिन्यातील शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी विशेष मानली जाते. कारण पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणींना उजाळा देत, गणपती सेवा करण्याची संधी प्राप्त होत असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा गेला जाते. नवरात्रात येणारी विनायक चतुर्थी कधी आहे? व्रताचरण कसे करावे? जाणून घेऊया...
घटस्थापना होऊन नवरात्राची सुरुवात झाली आहे. यंदा २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव असणार आहे. नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. आपापल्या परिने यथाशक्ती देवीची सेवा केली जाते. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे.
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
नवरात्रीतील विनायक चतुर्थी कधी आहे?
गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. अश्विन शुद्ध पक्षात येणारी विनायक चतुर्थी गुरुवारी येत आहे. त्यामुळे गणपती पूजनासह दत्तगुरू, दत्तगुरुंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, नृसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ यांचे आवर्जून स्मरण करावे. तसेच गुरुवारी सद्गुरूची कृपा लाभण्यासाठी गुरुमंत्रांचे जप, उपासना, आराधना करावी, असे सांगितले जाते. यंदा गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी आहे.
गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो
नवरात्रातील विनायक चतुर्थीला देवीच्या पूजनासह गणपतीची पूजा अवश्य करावी. गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. मनोभावे नमस्कार करावा. प्रार्थना करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. तसेच गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.