२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:55 IST2025-12-19T19:50:32+5:302025-12-19T19:55:15+5:30
Angarak Vinayak Chaturthi December 2025: २०२५ मधील शेवटची अंगारक विनायक चतुर्थी कधी आहे? अंगारक योगाचे महत्त्व काय? गणेशाची उपासना कशी करावी? जाणून घ्या...

२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
Angarak Vinayak Chaturthi December 2025: सन २०२५ ची सांगता होत आहे. अवघ्या काही दिवसांनी २०२६ या इंग्रजी नववर्षाची सुरुवात होत आहे. मराठी वर्षातील अत्यंत पवित्र, शुभ मानला गेलेला मार्गशीर्ष महिना संपून, पौष महिना सुरू होणार आहे. पौष महिन्याच्या विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे विशेष मानले जाते. या दिवशी गणपतीची विशेष उपासना केल्यास शुभ पुण्य आणि अनेक लाभ प्राप्त होऊ शकतात, गणेशाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. २०२५ मधील शेवटची अंगारक विनायक चतुर्थी कधी आहे? अंगारक योगाचे महत्त्व काय? गणेशाची उपासना कशी करावी? जाणून घेऊया...
प्रत्येक मासाच्या शुक्ल चतुर्थीला `विनायक चतुर्थी' असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. तर ज्या कृष्ण चतुर्थीला 'संकष्ट चतुर्थी' म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. प्रत्येक मासाच्या शक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत.
चतुर्थीला अंगारक योगाचे महत्त्व
मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.
‘अशी’ करा गणेश उपासना
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून 'ॐ सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी. गणेश पूजनात आवर्जून अथर्वशीर्ष म्हणावे. गणपतीला आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात. जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. शिवाय मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. अथर्वशीर्ष म्हणणे शक्य नसेल, तर संकटनाशनम् स्तोत्र म्हणावे. गणपतीची मनोभावे सेवा करावी. शक्य असेल. तर गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे.