आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:33 IST2020-08-25T03:32:53+5:302020-08-25T03:33:02+5:30
शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात.

आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो
मोहनबुवा रामदासी
आम्ही काय कुणाचे खातो। श्रीराम आम्हाला देतो।
जो अन्न देतो उदरासी। शरीर विकावे लागे त्यासी।
मां जेणे घातले जन्मासी। त्यासी कैसे विसरावे।।
मातेच्या उदरातून हा जीव म्हणून जेव्हा बाहेर आला, त्या क्षणापासून ईश्वराने त्याच्या जीवनाची चिंता वाहिलेली असते. खरंतर जीव जन्माला घालण्यापूर्वी भगवंताने त्या जिवाच्या सर्व व्यवस्था व अवस्था निश्चित करून अधोरेखित केलेल्या असतात. या जीवसृष्टीवर भगवंताची एकमेव सत्ता आहे. त्या भगवंताच्या ऋणात राहणं हेच साधकाचं प्रथम कर्तव्य असतं. अन्नाचा कण ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराने केवळ माणूसच नव्हे, तर सृष्टीतील सर्व जीव, जंतू, पशू, पक्षी आणि प्राण्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली असते. दुर्दैवाने या पशू, पक्षी, प्राण्यांना बुद्धी नाही असे म्हणतात; परंतु हेच पशुपक्षी बुद्धीचे वरदान माणसांपेक्षा कमी असूनही निसर्गाचे नियम पाळतात. मात्र, माणूस असूनही तो निसर्गाचे नियम नीट पाळत नाही. म्हणून तर निसर्गाचे संतुलन ढळलेले आपल्याला पाहायला मिळते. शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. त्यामागे ईश्वर नावाची शक्ती मातेच्याच रूपात असते. तीच प्रत्येक जिवाला आई म्हणून घास भरवते. म्हणूनच ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो’ या विचारांचा प्रभाव मनावर असावा आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या. गरजांचा डोंगर वाढला की, दु:ख पदरी पडत असतं. म्हणून प्रत्येक घास घेताना हा घास त्या रामाने माझ्यासाठी निर्माण केला आहे हा भाव असावा. त्यासाठी प्रयत्न, जिद्द ही हवीच! नाहीतर ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ या निष्क्रिय भावनेचा जाणीवपूर्वक त्याग करावा व हे सर्व रामाचे आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, तो मला कधीच उपाशी ठेवणार नाही ही श्रद्धा व हा भाव असावा.