आनंद तरंग: प्रयत्न सम्यक हवेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 00:49 IST2020-07-02T00:49:01+5:302020-07-02T00:49:18+5:30
तुम्ही विपश्यना साधना करत असाल, तर तुम्ही बुद्धांच्या अगदी जवळ आहात़ जरी शरीराने तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर जगाच्या दुसºया टोकाला राहात असाल तरी़ तसेच तुम्ही बुद्धांजवळ आहात

आनंद तरंग: प्रयत्न सम्यक हवेत
फरेदुन भुजवाला
जानेवारी १९७५ मध्ये सयाजी उ बा खिन यांच्या पाचव्या पुण्यतिथीच्या दिवशी काही परदेशी साधक ब्रह्मदेश, रंगून येथील धान्य केंद्रावर विपश्यना साधना करण्यासाठी गेले होते़ तेव्हा तेथे ते भदंत वेबू सयाडो यांना भेटले़ त्यावेळी साधक व भदंत यांच्यात झालेल्या संभाषणाचा तपशील विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांनी विस्तृत दिला आहे़ तेव्हा भदंत म्हणाले होते, हे अगदी भगवान बुद्धांच्या काळातल्यासारखे आहे़ तेव्हासुद्धा अनेक देशांतून, गावांतून लोक भगवान बुद्ध यांना वंदन करण्यासाठी येत होते़ भगवान बुद्ध यांनी त्यातील प्रत्येकाला साधना विधीचा मार्ग शिकविला़ बुद्धांच्या मार्गाचे पालन करणाऱ्यांची दु:खापासून मुक्ती झाली़ तुम्ही सर्वजण प्राचीन काळातील त्या शोध घेणाऱ्यांसारखेच आहात़ तुम्हीही बुद्धांची शिकवण समजून घ्याल आणि त्यांच्या उपदेशांचे पालन कराल, तेव्हा तुम्हालादेखील दु:खापासून मुक्ती मिळेल़ एकदा का बुद्धांचा उपदेश तुमच्या अनुभूतीवर उतरला, मग तो कितीही लहान वा सारांशरूपाने असो, तुम्ही तो काळजीपूर्वक, अविराम आचरणात आणला तर सुख तुमचेच असेल़
भगवान बुद्ध म्हणाले होते की, तुम्ही विपश्यना साधना करत असाल, तर तुम्ही बुद्धांच्या अगदी जवळ आहात़ जरी शरीराने तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर जगाच्या दुसºया टोकाला राहात असाल तरी़ तसेच तुम्ही बुद्धांजवळ आहात आणि विपश्यना साधनेचा अभ्यास करत नसाल, तर तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर आहात़ त्यामुळे जर तुम्ही विपश्यना साधनेचा अभ्यास करीत असाल, तर तो अविरतपणे सुरू राहायला हवा़ तुमचे प्रयत्न सम्यक हवेत़ जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तो यशस्वी होतोच़ जर प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अवघड नसेल, पिडादायी नसेल, तर मग आराम करू नका, सातत्याने प्रयत्न करत राहा, हे भदंत यांचे मार्गदर्शन साधकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे, असे गोएंंका आवर्जून सांगतात आणि ते सत्यही आहे़