Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:17 IST2025-04-24T18:15:16+5:302025-04-24T18:17:14+5:30
Akshaya Tritiya 2025: ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त सोने दान करणे शक्य नाही, निदान पुढील वस्तूंचे दान करा आणि भरघोस पुण्य कमवा.

Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
जे देतो ते दुपट्टीने परत मिळते, हा निसर्गाचा नियम आहे. मग तो आनंद असो वा दुःख! जे पेराल ते उगवेल! म्हणूनच आपल्याकडे सण उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करा असे सांगितले जाते. जेणेकरून तुम्ही जेवढे द्याल ते दुपटीने तुम्हाला परत मिळेल. अक्षय्य तृतीयेला तर दानाचे महत्त्व अधिकच!
या वर्षी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) ३० एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने दान करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते, परंतु आजच्या महागाईच्या काळात एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने दान करणे जवळजवळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत काही वस्तूंचे दान शास्त्रात सुवर्णदान मानले जाते. चला तर, अक्षय्य तृतीयेला कोणत्या ५ वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊया.
अन्नदान : अक्षय्य तृतीयेला धान्य दान करणे हे खूप पुण्यपूर्ण मानले जाते. शास्त्रांमध्ये, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. पौराणिक कथांनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला स्वर्गलोकाचीच नव्हे तर मोक्ष प्राप्ती मिळाली असे उल्लेख आहेत. त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला आपल्या घरी नैवेद्याचे ताट केल्यावर देवाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला, कुटुंबाला अन्नदान नक्की करा.
गूळ : अक्षय्य तृतीयेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रांनुसार, गूळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते. कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून निघते. शास्त्रांमध्ये गूळ दान करणे हे सोन्याचे फळ दान करण्यासारखे पुण्यकारक मानले जाते.
जलदान : पाण्याला जीवन म्हणतात. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. अक्षय्य तृतीया हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो वा प्राणी, पक्षी पाण्याने प्रत्येक जीव व्याकुळ होणारच! म्हणून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र गरजूंना दान करू शकता.
खडे मीठ : अक्षय्य तृतीयेला सैंधव मीठ दान केल्याने पुण्य मिळते. कारण सैंधव मीठ भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मीठ समुद्रातून मिळते, म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे. मीठ हा अन्नपदार्थातला मूलभूत घटक असल्यामुळेही त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यासाठी मीठाचे दान करावे. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी यावी म्हणून दान केलेले मीठ तुमच्याही आयुष्यात समृद्धी आणेल हे नक्की!
वस्त्रदान : अक्षय्य तृतीयेला वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. कपडे ही मूलभूत गरजांपैकी एक मानली जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला लज्जारक्षणासाठी वस्त्र दान केल्याने सोने दान केल्यासारखेच फायदे मिळतात. म्हणून अक्षय्य तृतीयेला विशेषतः पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा असे सुचवले जाते.