जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:43 IST2025-05-01T11:41:35+5:302025-05-01T11:43:05+5:30
Adi Shankaracharya Jayanti 2025: आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण तसेच हिंदू धर्माच्या प्रसार, प्रचाराचे प्रचंड कार्य अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात केले.

जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
Adi Shankaracharya Jayanti 2025: भारतीय तत्त्वपरंपरेत सर्वात श्रेष्ठ व मानाचे स्थान भूषविणाऱ्या अद्वैत-वेदान्त दर्शनाचे प्रणेते भगवान भाष्यकार श्रीमद् शंकराचार्य यांची जयंती यंदा, ०२ मे २०२५ रोजी आहे. वैदिक संस्कृतीमधून विकसित होत गेलेला व कालानुसार बदलत गेलेलाच धर्म पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला, असे मत सर्वसामान्यपणे मांडले जाते. भारतातील छोटीछोटी राज्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत होती. एकूण समाजातील सुसंवाद नाहीसा होऊन तो अधिकाधिक विघटित होऊ लागला. त्यांमध्ये सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य करणारी अद्वितीय कर्मयोगी विभूती म्हणजे आद्य शंकराचार्य. जयंती दिनानिमित्त आद्य शंकराचार्यांच्या विस्तृत जीवन चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...
सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनःस्थापना करणारे, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला झाल्याचे सांगितले जाते. अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञानी शंकराचार्यांनी भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली, असे सांगितले जाते. केरळ प्रांतातील कालडी गावी शिवगुरु-आर्यांबा या सात्त्विक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या या परिपूर्ण शिवावताराने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा संपूर्ण व सांगोपांग अभ्यास केलेला होता. त्यांना बाराव्या वर्षी यच्चयावत् सर्व शास्त्रे मुखोद्गत झालेली होती.
सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार, प्रसार
नर्मदा किनारी सद्गुरु श्री गोविंदयतींकडून कृपाप्रसाद प्राप्तीनंतर, प्रमुख दश उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, विष्णुसहस्रनाम आदी ग्रंथांवरील सर्व भाष्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केली. पुढील सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार, प्रसार करून हा दिग्विजयी अवतारी महात्मा केवळ बत्तिसाव्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन निजधामी परतला. अर्थात् त्यांचे लौकिक रूप अदृश्य झाले असले तरी, आपल्या ग्रंथांच्या दिव्यरूपाने ते सदैव सर्वांच्या पाठीशी आहेतच.
सनातन वैदिक धर्माचे संरक्षण व पुनरुज्जीवन अलौकिक कार्य
आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले. आद्य शंकराचार्यांनी दोन ते तीन वेळा संपूर्ण भारत पालथा घातला, असे म्हटले जाते. अनेकविध नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले. त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले, अशी मान्यता आहे. सनातन वैदिक धर्माचे त्यांनी केलेले संरक्षण व पुनरुज्जीवन कार्य हे वादातीत अलौकिक आहे. श्री आचार्य झाले नसते तर संपूर्ण भारतीय उपखंड हा वेदविरोधी व अपूर्ण अशा नास्तिक संप्रदायांनी गिळंकृत केला असता. श्री आचार्यांच्या थोर कार्यामुळेच अजरामर व सर्वश्रेष्ठ अशी आपली वैदिक संस्कृती आपण आजही अभिमानाने जोपासू शकलेलो आहोत.
भारतीय संस्कृती शकले होण्यापासून वाचली
आपल्या भारतभ्रमणात शंकराचार्यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा चार दिशांना चार पीठांची स्थापना करून शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले. श्रीमद् आचार्यांचा आणखी एक खूप मोठा उपकार म्हणजे, त्यांनी त्या काळात प्रामुख्याने प्रचलित असलेल्या, गणपती, शंकर, विष्णू, देवी व सूर्य या पाच ब्रह्मस्वरूप देवतांच्या सर्व उपासना संप्रदायांचा "पंचायतन पूजा" या एकाच प्रकारात केलेला विलक्षण समन्वय, हा होय. आचार्यांच्या या सुरेख समन्वयामुळेच विविध संप्रदाय आपापले हेवेदावे सोडून एकत्र आले व भारतीय संस्कृती शकले होण्यापासून वाचली. सनातन धर्माच्या संधारणेसाठी प्रचंड ग्रंथरचना करून भक्कम तात्त्विक आधार निर्माण करून ठेवला. विविध स्थानांवर देवतांची प्रतिष्ठापना करून लोकांना उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले.
भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शनही घेतले
कन्याकुमारीपासून ते पार अफगाणिस्तानापर्यंत आणि पश्चिम सागरापासून ते पूर्वेच्या कामाख्येपर्यंत अखंड भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली. त्याच काळात त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शनही घेतले. आद्य शंकराचार्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार करत, त्याचा अधिक पुरस्कार केला. तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय ठेवा, असे ते नेहमी सांगत. आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच आजही चारही धर्मपीठांची कामे सुरळीत सुरू आहेत. आद्य शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. चराचरात परमेश्वर सामावलेला असून, त्याचा आदर करायला हवा, अशी त्यांची शिकवण असे.
अद्वितीय कर्मयोगी
कर्मसंन्सासपूर्वक ज्ञाननिष्ठा हे गीतेचे सार सांगणाऱ्या आचार्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कार्यामुळे भारावलेल्या भक्तांनी ‘अद्वितीय कर्मयोगी’ अशा शब्दांत संबोधिले. आद्य शंकराचार्यांनी प्रचंड कार्य अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात केले. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतातदेखील तेवढ्याच तेजाने जाणवत आहे. ते थोर तत्वज्ञ, महापंडित, प्रतिभावान कवी, समाजसुधारकांतील अग्रणी आणि चतुर संघटक होते. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला. भारतभूमीचे चिरंतन आणि अमूल्य वैभव असणाऱ्या श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या पावन, सर्वतीर्थास्पद श्रीचरणी, श्रीशंकरजयंतीच्या पर्वावर, सर्वांनी मिळून प्रेम-कृपादानाची याचना करीत वारंवार नतमस्तक होऊया; आणि श्री माउली म्हणतात, त्याप्रमाणे श्रीमद् आचार्यांनी दाखवलेल्या उपासनावाटेवरून मार्गक्रमण करीत ब्रह्मबोधाच्या महानगरीत सुखरूप पोहोचूया. श्री आचार्यांचे कमीतकमी एक तरी स्तोत्र दररोज न चुकता म्हणायचा सेवाप्रयत्न आपण सर्वांनी अंगवळणी पाडूया. त्याद्वारे आचार्यांच्या कृपाऋणाचे, त्यांच्या त्रिभुवनपावन नामाचे स्मरण आपल्याला अविरत होत राहील.