ग्रामपंचायतीचा डाव जिंकण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची ताकद पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:26+5:302021-01-04T04:27:26+5:30
बीड : कोरोनामुळे लांबलेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्तांतर झालेल्या ...

ग्रामपंचायतीचा डाव जिंकण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची ताकद पणाला
बीड : कोरोनामुळे लांबलेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्तांतर झालेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कस लागणार आहे. गावपातळीवरच्या निवडणुका असल्या तरी सत्तेचा प्रभाव वाढविण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवरील नेतेमंडळी कामाला लागली आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत समर्थक कार्यकर्त्यांकडून गाव पातळीपर्यंत मोर्चेबांधणी करीत राजकीय जम बसविला जातो. गावांच्या विकासासाठी योजना राबविताना अडथळे येऊ नये म्हणून सर्व बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न असतो. पंचायत समिती असो वा जिल्हा परिषदेत सत्ता प्राप्त करताना गावपातळीवरून मिळालेल्या सहकार्याची पोच पदाधिकाऱ्यांना करावी लागत असून त्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे. गावातील गटामधील वाद मिटवून उमेदवारी निश्चित करून त्याला निवडून आणण्यासाठी आता जिल्हा परिषदेतील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. आपल्या पक्षाच्या समर्थकांकडे ग्रामपंचायत आली तर सत्तेचा लाभ गावापर्यंत मिळू शकतो, हे पटवून नेत्यांनी आपल्या गटातील ग्रामपंचायतींसह लगतच्या गटातील ग्रामपंचायती बिनविरोध आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रसंगी निवडणूक झालीच तर डाव जिंकायचा कसा याचे आडाखे बांधले जात आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा गट
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजी सिरसाट यांच्या घाटनांदूर गटात हनुमंतवाडी आणि दत्तपूर ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. यापैकी गटातील हनुमंतवाडी व लगतची मूर्ती या दोन ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. तर दत्तपूरमध्ये भाजपशी सामना करावा लागणार आहे. गटात व गटाबाहेरच्या पट्टीवडगाव व अन्य ग्रामपंचायतींमध्ये सिरसाट यांचा प्रभावी संपर्क असला तरी भाजपकडून लढत कशी होते हे पहावे लागणार आहे.
उपाध्यक्षांचा चिंचोली माळी गट
जि. प. चे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचा चिंचोली माळी गट असून ७३७ मतांनी ते जि. प. निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्याकडे शिक्षण व आरोग्य सभापतीपद आहे. त्यांच्या या गटातील लाखा, भोपला आणि जाधवजवळा ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यापासून आवश्यक त्या राजकीय मदतीसाठी सर्वोतोपरी ताकद लावली आहे. मात्र भाजपचे रमेश आडसकर, संतोष हंगे गटाचे आव्हान राहणार आहे.
बांधकाम सभापतींचा तेलगाव गट
जि. प. चे बांधकाम सभापती जयसिंह सोळंके तेलगाव गटातून निवडून आलेले आहेत. त्यांच्या गटात भोपा आणि कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक आहे. पैकी कोथिंबीरवाडी बिनविरोध आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. आ. प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके तसेच स्वत:च्या जनसंपर्कातून गटासह गटाबाहेरच्या जहांगीर मोहा, रूईधारूर, कासारी या ग्रामपंचायती आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भोपा व अन्य ठिकाणी भाजपचे आडसकर गटाचे तगडे आव्हान राहणार आहे.
समाजकल्याण सभापतींचा तालखेड गट
समाजकल्याण सभापती आबुज यांच्या तालखेड गटात निवडणूक नसली तरी नेते प्रकाश सोळंके यांच्या नियोजनात लगतच्या ग्रामपंचायती आणण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
कृषी सभापतींचा रेवकी गट
जि. प. कृषी सभापती सविता मस्के यांच्या गटात निवडणूक नसली तरी लगतच्या गटातील ग्रामपंचायतींसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
बालकल्याण सभापतींचा पाचेगाव गट
महिला, बालकल्याण सभापती यशोदा जाधव या पाचेगाव गटातून विजयी झाल्या. या गटातही निवडणूक नसल्याने पुढील टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी त्या करत आहेत.
घाटनांदूर गट - २ ग्रामपंचायती
चिंचोलीमाळी गट -- ३ ग्रामपंचायती
तेलगाव गट -- २ ग्रामपंचायती