Zilla Parishad chaired by OBC woman | जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अखेर मंगळवारी मुंबईत आरक्षण सोडत जाहीर झाली. बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या जिल्हा परिषदेत आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता असलीतरी राज्यातील बदलणाऱ्या समिकरणांवरही खूप काही अवलंबून आहे. आरक्षण निश्चित झाल्यामुळे राजकीय मोर्चेबांधणीला येत्या काही दिवसात वेग येणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आ. सुरेश धस, शिवसंग्राम आणि गेवराई तालुक्यातील बदामराव पंडित यांच्या गटाने बळ दिल्यामुळे भाजपला सत्ता काबीज करता आली. तसेच खुल्या प्रवर्गाला अध्यक्षपद सुटलेले असतानाही ओबीसी प्रवर्गातील महिलेला भाजपने संधी दिली. याची चर्चाही राजकीय क्षेत्रात झाली होती. १९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत झाली. नव्या वर्षात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेत ओबीसी महिला सदस्यांची संख्या जवळपास १८ आहे. भाजपकडून सारिका डोईफोडे, डॉ. योगिनी थोरात, अनिता मुंडे आदींची नाव चर्चेत आहे. डॉ. योगिनी थोरात यांना अडीच वर्षांपूर्वीच संधी अपेक्षित होती. सुरुवातीला साथ देणाºया शिवसंग्रामचे सदस्य भाजपच्या गोटात सामील झाले आहेत.
सुरेश धस भाजपचे आमदार आहेत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात भाजपचा गट प्रभावी आणि मोठा होत गेला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाला अध्यक्षपदाची संधी मिळते यावर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेल. राष्ट्रवादीकडे आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित या गटांकडे ओबीसी महिला उमेदवार आहेत. यात आ. सोळंके यांच्या सदस्यांचा गट संख्येने मोठा आहे. ऐनवेळी काँग्रेसच्या आशा दौंड यांचाही विचार राष्ट्रवादीकडून केला जाऊ शकतो. बदामराव पंडित गटाचे (शिवसेना) चार सदस्य आहेत. सध्या राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना, राष्टÑवादी आणि कॉँग्रेस एकत्र आल्यास चुरस निर्माण होणार आहे.
बीड जि.प.च्या लढतीकडे
पुन्हा लागणार लक्ष
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्याचप्रमाणे जि.प. अध्यक्ष कोण होईल? याकडे लक्ष लागले आहे.
मागील निवडीच्या काळात भाजपचे ५ तर राष्टÑवादीचा १ आमदार होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून राष्टÑवादी काँग्रेसचे ४ तर भाजपचे २ आमदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे अडीच वर्षांत प्राबल्य राहिलेल्या भाजपला यंदा आव्हान निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सारिका डोईफोडे प्रबळ दावेदार
डोईफोडे कुटुबांचे मुंडे कुटुंबाशी दोन पिढयांचे संबंध आहेत. तर राणा डोईफोडे हे मुंडे यांच्या निकटवर्तीय वर्तुळात असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते सक्रिय होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पाली जिल्हा परिषद सर्कलमधील सारिका डोईफोडे या प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जाते.

Web Title: Zilla Parishad chaired by OBC woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.