अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नाेकरीस असलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. दरम्यान या युवकास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्यांचेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी स्वाराती मधील दोन सुरक्षारक्षकास आणि उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांना मारहाण केली असल्याची चर्चा असून या मारहाणीस सिनियर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये हंगामी स्वरुपात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा गणेश वैजनाथ मुंडे (वय २६ रा. वरवंटी) हा तरुण सोमवारी रात्री आपली ८ पर्यंतची ड्युटी आटोपून गावाकडे जाण्यासाठी लोखंडी सावरगाव येथील टी पॉईंटवर वाहनांची वाट पाहत रस्त्यावर उभा होता. यावेळी लातूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने गणेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. बाह्य रुग्ण विभागात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी गणेशवर प्राथमिक उपचार करुन त्यास तातडीने हायर सेंटरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी गणेशला इतरत्र घेऊन जात असताना त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यास पुन्हा स्वारातीत उपचारासाठी आणण्यात आले. यानंतर उपचार सुरु असतानाच काही वेळात गणेशाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी गणेश यास योग्य उपचार मिळाले नाहीत,असा आरोप केला. दरम्यान मंगळवारी सकाळी मयत गणेश यांचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेऊन दुपारी वरवटी येथील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी स्वाराती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उशीरापर्यंत कसल्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती.
नातेवाईकांचा राडा, डॉक्टरांचा संयम
नातेवाईकांनी राडा करीत स्वाराती रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासमोर उपस्थित असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना मारहाण करीत बाह्य रुग्ण विभागात प्रवेश मिळवला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत हुज्जत घालत मारहाण केली. ही माहिती कळताच रुग्णालय विभागातील सिनियर वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश आब्दागिरे, डॉ. प्रमोद दोडे, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. नील वर्मा यांनी अत्यंत संयम ठेवत मयताच्या नातेवाईकांना सर्व परिस्थिती आणि वैद्यकीय हतबलता सांगितली. तरीही नातेवाईकांनी बराच वेळ राडा घातला.