यात्रा, उत्सवांना कोरोनाचा मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:00+5:302021-03-27T04:35:00+5:30
- सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन अंबाजोगाई : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. ...

यात्रा, उत्सवांना कोरोनाचा मोठा फटका
-
सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन
अंबाजोगाई : रासायनिक खतांमुळे शेतीचे होणारे नुकसान पाहता, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमीन सुपीक राहते. जमिनीचा कस टिकून राहतो. हळूहळू शेतीतील उत्पादन वाढत जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीला आवश्यक असे सर्व पोषक घटक शेणखतातून उपलब्ध होतात. महागडी कीटकनाशके फवारण्याची आवश्यकता भासत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले आहे.
राडी-मुडेगाव रस्त्यावर मोठे खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा. अन्यथा त्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. शहर व परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच चालल्याने आरोग्य प्रशासनाचे काम वाढले आहे.
होळीचा सण साधेपणाने साजरा करा
अंबाजोगाई : होळीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी होळी व धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहाने व मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सलग लॉकडाऊनमध्ये हा होळीचा सण आल्याने अनेक उत्सवप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे. होळीचा सण साजरा करण्यासाठी रंग, पिचकाऱ्या यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र या लॉकडाऊनमुळे यावर्षी प्रत्येकाने हा सण साधेपणाने आपल्या घरातच साजरा करावा, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.