काम करणे माझी हॉबी, तर कृषी आवडते क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:24+5:302021-08-28T04:37:24+5:30
बीड : प्रशासनातील कोणताही विभाग असो काम करणे ही माझी हॉबी आहे, तर कृषी शिक्षणामुळे ते माझे आवडते क्षेत्र ...

काम करणे माझी हॉबी, तर कृषी आवडते क्षेत्र
बीड : प्रशासनातील कोणताही विभाग असो काम करणे ही माझी हॉबी आहे, तर कृषी शिक्षणामुळे ते माझे आवडते क्षेत्र आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात लोकाभिमुख प्रशासन देण्याचा आपला मानस राहील, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बृहन मुंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्तपदी बदली झाल्याने बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील, तसेच पुणे जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी मध्यान्हानंतर पवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, प्रमोद काळे, चंद्रशेखर केकाण, प्रदीप काकडे, आदी उपस्थित होते.
-------
तहसीलदार ते झेडपी सीईओ
१९८८ मध्ये महसूल विभागात पन्हाळा येथे तहसीलदारपदी पहिली नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार यांनी नागपूर, चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे येथील आयुक्तालय त्यानंतर पुणे येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षे त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात शिडर्प संस्थानशी संलग्न ३४ प्रकल्प त्यांनी पूर्ण केले.
-------------
नरेगातील अनियमिततेमुळे बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. तसेच जिल्हा प्रशासनाला बाजू मांडण्याचे निर्देशत केले होते. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीनंतर सीईओ अजित कुंभार यांची बदली झाल्याने बीडला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व सीईओ अजित पवार हे दोन्ही अधिकारी नवे असल्याने नरेगाबाबत मार्गदर्शनासाठी दोघे मंगळवारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.
----------
रुजू झाल्यानंतर सीईओ पवार यांनी सर्व विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासह सद्य:स्थितीबाबत महिती घेतली. गर्भवती महिलांचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी विशेष मोहीम आखण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
---------
270821\27_2_bed_11_27082021_14.jpeg
नुतन सीईओ अजित पवार यांचे स्वागत करताना जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट