रखडलेल्या परळी बायपास रस्त्याच्या कामाचा अखेर निघाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:05+5:302021-07-03T04:22:05+5:30
अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या परळी बायपासचे मागील सरकारच्या काळात अनेकवेळा भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. धनंजय ...

रखडलेल्या परळी बायपास रस्त्याच्या कामाचा अखेर निघाला मुहूर्त
अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या परळी बायपासचे मागील सरकारच्या काळात अनेकवेळा भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या दोनही कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून या दोनही कामांना प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहर बायपासचे अंबाजोगाई रोडवरील बायपास जंक्शन येथे दुपारी दोन वाजता तसेच परळी ते धर्मापुरी रस्त्याचे गंगाखेड रोड जंक्शन येथे दुपारी अडीच वाजता भूमिपूजन होणार आहे.
या कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ. संजय दौंड, परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हलगे आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोविडविषयक निर्बंधांमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मे. यश कन्स्ट्रक्शन या कंपनीला या दोन्ही रस्त्यांचे काम मंजूर झाले असून त्यांच्यामार्फत भूमिपूजन होताच तातडीने काम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
परळी बायपास या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी डांबरी रस्त्याचे काम एका वर्षात तर परळी-धर्मापुरी या साडेबावीस किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ९ महिन्यात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
परळीकरांची वचनपूर्ती
विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या वचननाम्यात परळी बायपास, परळी - अंबाजोगाई तसेच परळी -धर्मापुरी, परळी- गंगाखेड या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते . त्यानुसार अवघ्या दीड वर्षात परळी अंबाजोगाई या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून परळी बायपास व परळी धर्मापुरीच्या कामाचा शनिवारी शुभारंभ होत आहे . परळी ते संगम या रस्त्याचे कामही सध्या प्रगतिपथावर असून परळी गंगाखेड या रस्त्याच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे.