राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:24 IST2018-09-29T00:22:27+5:302018-09-29T00:24:04+5:30
शहरातून जाणाºया खामगाव - पंढरपूर रस्त्यावर होणारे काम निकृष्ट असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एम.एस.आर.डी.चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. या कामात गैरप्रकार असून, उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच कामाचा दर्जा सुधारत अर्धवट कामे पूर्ण करावीत आशी मागणी होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शहरातून जाणाºया खामगाव - पंढरपूर रस्त्यावर होणारे काम निकृष्ट असून कुठलेही नियम न पाळता हे काम आटोपण्याचा घाट घातला जात आहे. एम.एस.आर.डी.चा एकही अधिकारी याकडे फिरकत नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कामाचा गाडा हाकत आहेत. या कामात गैरप्रकार असून, उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच कामाचा दर्जा सुधारत अर्धवट कामे पूर्ण करावीत आशी मागणी होत आहे.
शहरातून खामगाव - पंढरपूर ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम एका खाजगी कंपनीकडे सोपविलेले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला दिसत आहे. रस्त्यालगत नालीचे बांधकाम होत आहे. यामध्ये जागोजागी नालीची पडझड झाली असून, कामात गजाचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत एस.एस.आर.डी.च्या अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. काम सुरु झाल्यावर काही ठिकाणी गजाचा वापर करण्यात आला. मात्र, यानंतरही नाली जागोजागी ढासळत आहे.
तसेच रस्ता दुभाजकाच्या कामातही तडे जात असून, यामध्ये लोखंड वापरले जात नाही. तसेच पाणी देखील मारणे बंद आहे. सदर रस्त्यामध्ये नगर परिषदेची पाणीपुरवठा पाईपलाईन खराब झाली आहे. कंत्राटदाराने पर्यायी टाकलेली पाईपलाईन जागोजागी फुटत असल्यामुळे शहरातील अशोकनगर, वैघनाथ नगर, उदयनगर, लक्ष्मीनगर या भागाचा पाणीपुरवठा चार महिन्यापासून बंद आहे. नागरिकांना पाण्यावाचून राहण्याची पाळी येत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण रखडले आहे. सोबत बसस्थानकासमोर भर व्यापारपेठेत नाली बांधण्यासाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. महिनाभरापासून काम न केल्याने व्यापाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
या संदर्भात खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची आपण स्वत: पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करु. रस्त्याचे काम नियमानुसार व चांगल्या दर्जाचे होईल यासाठी निश्चित प्रयत्न करु, असे एम. एस. आर. डी. चे अधीक्षक अभियंता देशमुख यांनी सांगितले.