महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:25+5:302021-03-18T04:33:25+5:30
अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील कोपरा (जि. लातूर) येथील २६ वर्षीय तरुणीवर गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने अत्याचार करून तिला ...

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत
अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील कोपरा (जि. लातूर) येथील २६ वर्षीय तरुणीवर गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून, अद्याप १६ पैकी केवळ दोन आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. या संतापजनक प्रकरणातील उर्वरित सर्व आरोपींना तत्काळ अटक करून भरचौकात शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली.
त्यांनी मंगळवारी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पीडितेची आणि कुटुंबियांची भेट घेतली. कोपरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शुक्रवारी १२ मार्च रोजी दुपारी २६ वर्षीय पीडितेच्या घरासमोर काही गावगुंडांनी जेसीबी लावून जमीन उकरण्यास सुरुवात केली. गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाच्या मदतीने पीडितेच्या घरासमोरील देवीच्या मूर्तीची विटंबना करीत तोडफोड केली. यावेळी घरात एकट्या असणाऱ्या पीडितेने धैर्याने त्या सर्वांना विरोध करत व्हिडिओ शूटिंग सुरू केले. याच्या रागातून त्या सर्वांनी पीडितेचा मोबाईल हिसकावून घेत तिला बेदम मारहाण सुरु केली आणि जेसीबीखाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिचा विनयभंग करीत नाजूक ठिकाणी दगड मारून आणि कटरसारख्या वस्तूने हातावर वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व अत्याचारात काही महिलांनी त्या गुंडांना साथ दिली. जखमी पीडितेवर किनगाव शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले.
सध्या तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून १६ जणांवर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (दि. १६) भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, आमदार रमेश कराड यांनी स्वाराती रुग्णालयात पीडितेची भेट घेतली. यावेळी खापरे म्हणाल्या की, सध्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. घटनेच्या चार दिवसानंतरही फक्त दोघांना अटक करणारे पोलीस आरोपींना पाठीशी घालण्यात धन्यता मानत आहेत. अत्याचाराची फिर्याद घेऊन पीडिता ठाण्यात गेली असता तिला अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. तक्रारीची तातडीने दखल घेऊन कारवाई झाली असती तर सर्व १६ आरोपी पोलिसांच्या हाती लागले असते. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
===Photopath===
170321\17bed_1_17032021_14.jpg
===Caption===
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे