जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर पडली खिडकी, परिसरालाही तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:14+5:302021-06-01T04:25:14+5:30

बीड : जिल्हा रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीच डागडुजी केली होती; परंतु सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. ...

A window fell on the patient at the district hospital, the area also looked like a lake | जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर पडली खिडकी, परिसरालाही तलावाचे स्वरूप

जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर पडली खिडकी, परिसरालाही तलावाचे स्वरूप

बीड : जिल्हा रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीच डागडुजी केली होती; परंतु सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. नव्यानेच बसविलेल्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये खिडकी कोरोनाबाधित रुग्णाच्या अंगावर पडली. सुदैवाने त्याला जखम झाली नाही. तर बाहेर परिसरालाही सर्वत्र पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. लाखो रुपयांची उधळपट्टी केली असली तरी डागडुजी मात्र कागदावरच असल्याचे यावरून दिसून येते.

मागील वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले. याच महामारीत विविध दुरुस्ती आणि उपाययोजनांच्या नावाखाली आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने लाखो रुपयांची उधळपट्टी, डागडुजीवर केलेली आहे; परंतु याचे काम निकृष्ट झाल्याबाबत सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या. असे असले तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आता दिसत आहे. सोमवारी शहरात दुपारी थोडा पाऊस झाला. यात वादळही होते. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ मधील नव्यानेच बसविलेली खिडकी रुग्णाच्या खाटावर पडली. सुदैवाने रुग्ण बसलेला असल्याने त्याला जखम झाली नाही. येथे जर एखादा रुग्ण झोपलेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, असा संशय व्यक्त करण्यात आला. हे काम तर निकृष्ट झालेच; पण बाहेर परिसरातही सर्वत्र खड्डे पडले आहेत. सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट केले असून नाली ठेवलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी चिखल झाला तर काही ठिकाणी पाण्याचे डोह साचले होते. मेट्रन ऑफिससमोर जातानाही परिचारिकांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली. रुग्णालयाच्या परिसरात पहिल्याच पावसात सर्वत्र घाण साचलेली दिसली तसेच पाणीही साचले होते. त्यामुळे रुग्ण, नातेवाइकांसह डॉक्टर, कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून दर्जेदार काम करावे आणि हाल थांबवावेत, अशी मागणी जाेर धरू लागली आहे.

कंत्राटदारासोबत मिलीभगत

काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील अनेक कामांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे; परंतु अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मिलीभगत करून ही कामे निकृष्ट झाली आहेत. या कामांची माहिती संबंधित विभाग सांभाळणारे जितेंद्र देशपांडे यांच्याकडे मागण्यात आली; परंतु त्यांनी देतो असे, सांगितले. उशिरापर्यंत त्यांनी याबाबत माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे संशयाला आणखीनच बळ मिळाले आहे.

कोट

खिडकी तुटल्याचे आता तुमच्याकडूनच समजले. मी नेकनूरला दौऱ्यावर आहे. आलो की पाहतो.

-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

===Photopath===

310521\31_2_bed_13_31052021_14.jpeg~310521\31_2_bed_12_31052021_14.jpeg

===Caption===

जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये खिडकी तुटून खाटा पडली होती.~मेट्रन ऑफिससमोर साचलेले पाणी. याच पाण्यातून मार्ग काढत परिचारीकांना ऑफिसमध्ये जावे लागते.

Web Title: A window fell on the patient at the district hospital, the area also looked like a lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.