पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:54 IST2018-11-02T23:53:52+5:302018-11-02T23:54:40+5:30
गेवराई तालुक्यातील जातेगांव येथील विवाहिता कविता भरत पवार हिचा खून केल्या प्रकरणी तिचा पती भरत ताराचंद पवार यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी सुनावली.

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगांव येथील विवाहिता कविता भरत पवार हिचा खून केल्या प्रकरणी तिचा पती भरत ताराचंद पवार यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी सुनावली.
माजलगाव तालुक्यातील जामगातांडा येथील गोविंद गंपु राठोड यांची मुलगी कविताचा विवाह जातेगाव येथील भरत पवार याच्याशी २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर कविताला तीन ते चार महिने सासरच्यांकडून चांगल्या पध्दतीने नांदविले. त्यानंतर मात्र माहेरहून २ लाख आणण्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. हा सर्व प्रक ार कविताच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी जावई भरतकडे जाऊन त्याला समजावून सांगितले. मात्र सासरच्यांक डून कविताला त्रास सुरुच होता. दरम्यान २७ नोव्हेंबर २०१६ रोजी जातेगाव शिवारातील यमाई देवीच्या शेतामध्ये कविताचा धारदार चाकूने गळा कापून खून करण्यात आला. त्यानंतर भरत याने स्वत:च्या अंगावरदेखील चाकूने जखम केली. हा प्रकार भरतचे वडील ताराचंद पवार यांनी पाहिल्यानंतर मयत सून कविता व मुलगा भरत यास गावातील कोकाटे यांच्या जीपमधून बीड येथील रुग्णालयात घेऊन आले. मात्र दवाखान्यात आणण्यापूर्वीच कविताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला.
याप्रकरणी गोविंद राठोड यांच्या फिर्यादीवरुन कविताचा पती भरत, सासरा ताराचंद, दीर शरद व त्याची पत्नी सविता पवार विरोधात, खून केल्याप्रकरणी व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सपोनि हुंबे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
१५ साक्षीदार तपासले : सादर झालेल्या पुराव्यांचे अवलोकन
याप्रकरणाची सुनावणी अति.जिल्हा व सत्र न्या. - १ यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय पुरावा, परिस्थितीजन्य पुराव्याचे अवलोकन करुन व सरकारी वकील अॅड.राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या. बी.व्ही. वाघ यांनी आरोपी भरत पवार यास जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी वकील अॅड. राम बिरंगळ यांना अॅड.अमित हसेगांवकर, अजय राख, अनिल तिडके, बी.एस. राख, एस.व्हि सुलाखे, आर.पी. उदार, पी.एन. मस्कर व पैरवी अधिकारी बिनवडे यांनी सहकार्य केले.