पोलीस शिपायाविरुद्ध पत्नीने केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:17+5:302021-07-07T04:42:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस शिपायाने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून दहा लाख ...

पोलीस शिपायाविरुद्ध पत्नीने केला गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस शिपायाने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणावे यासाठी पत्नीचा सतत मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा तलवडा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई असलेला पती व त्याच्या घरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीमा नितीन सोनवणे (रा.धानोरा रोड, ह. मु. नांदलगाव) यांनी तलवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती नितीन भिवाजी सोनवणे (गोविंदनगर, बीड) याने व त्याच्या घरच्यांनी सतत मानसिक व शारीरिक छळ करून चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीमा यांचा विवाह २०१४ साली नितीन सोनवणे याच्यासोबत झाला होता. मात्र काही काळानंतर सीमा हिला सासरच्या लोकांकडून त्रास देणे सुरू झाले. पोलीस शिपाई असलेला नवरा व त्याचे कुटुंबीयांनी १० लाख रुपयांसाठी छळ सुरू केला. नेहमी उपाशी ठेवणे, घरात कोंडून ठेवणे ह. सततचा प्रकार सुरू होता. ‘मी पोलीस असल्याने माझे कोणी काही करू शकत नाही, तुला जीवे मारून टाकीन’ अशीही धमकी नितीन देत होता, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.
सततच्या छळाला कंटाळून सीमा नितीन सोनवणे यांनी तलवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती नितीन भिवाजी सोनवणे, सासरे भिवाजी धोडिंबा सोनवणे, कंधारी सोनवणे, मोहन भिवाजी सोनवणे, रेखा नितीन सवई, आरती मोहन सोनवणे, सचिन भिवाजी सोनवणे, सुनंदा सचिन सोनवणे, मिलिंद भिवाजी सोनवणे, पूजा मिलिंद सोनवणे, आश्रुबा साधू सोनवणे, शिवाजी खेमाजी सोनवणे, संगीता शिवाजी सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
....
गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ
पत्नीने पतीविरुद्ध वेळोवेळी तक्रार करूनदेखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा सर्व प्रकार गेल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.