गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:21+5:302021-07-21T04:23:21+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोनास्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस अद्यापही जागेवरच आहेत. 'गाव ...

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
बीड : जिल्ह्यातील कोरोनास्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस अद्यापही जागेवरच आहेत. 'गाव तिथे एसटी' ही संकल्पना सध्या तरी कागदावरच असून लालपरी केवळ शहरांसाठीच धावत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातील प्रवाशांना अद्यापही लालपरीची प्रतीक्षा असल्याचे दिसते. कोरोनाचा फटका लालपरीला बसला आहे.
जिल्ह्यात आठ आगार आहेत. यात बीड व अंबाजोगाई आगार सर्वांत मोठे आहे. बीड आगारात सध्या १०० बसेस आहेत. यातील ७६ बसेस सध्या धावत असून, २४ जागेवरच आहेत. तसेच बीड आगारात १३ शिवशाही बसेस असून केवळ एकच शिवशाही प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत नसल्याने ही बसही शहरांसाठी व लांब पल्ल्यावर धावत असल्याचे सांगण्यात आले. केवळ कोरोना परिस्थितीमुळे सामान्य प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रत्येक खेडेगावात बस सोडावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
आगोदर १२, आता आठ लाखच उत्पन्न
बीड आगाराला कोरोना आगोदर सरासरी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, सद्य:स्थितीत केवळ ७ ते ८ लाख रुपयेच मिळतात. यावरून लालपरी सध्या तोट्यात असल्याचे दिसते.
शाळा बंद, प्रवाशांची संख्याही कमीच
ग्रामीण भागात बसेस सुरू करताना रापम प्रवासी संख्या आणि मागणीचा विचार करते. सध्या शाळा बंद आहेत. त्यातच प्रवासी संख्या कमी असल्याने अनेक गावांत बस जात नाहीत. परंतु, तरीही रंजेगाव, नाथापूर, पिंपळनेर, हाजीपूर, हिवरा पहाडी, आदी गावांनी मागणी केल्यानंतर येथे बस सुरू करण्यात आली आहे. वडगाव व कुर्ला येथेही दोन दिवसांत बस सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.
---
आगारात १०० बसेस असून, ७६ सेवेत आहेत. आजही किमान १५ खेडेगावात बस जात नसेल. उत्पन्नातही चार ते पाच लाख रुपयांनी घट झाली आहे. ज्या गावांत प्रवासी संख्या आहे व मागणी आली, तेथे बस सुरू केली आहे.
एन. पवार, आगारप्रमुख बीड
--
बीड आगार
एकूण बसेस १००
चालू बसेस ७६
कोरोनाआधीच्या फेऱ्या ४०८
सध्याच्या फेऱ्या २१०
कोरोनाआधीचे उत्पन्न १२ लाख
आताचे उत्पन्न ८ लाख
शिवशाही बसेस १३
शिवशाही चालू १