जनावरांचा मृत्यू कशामुळे ? आता नमुने पुण्याच्या लॅबमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:39 IST2019-01-14T00:37:43+5:302019-01-14T00:39:31+5:30
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जनावरांचा मृत्यू कशामुळे ? आता नमुने पुण्याच्या लॅबमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर पाठविलेल्या नमुन्यांचे मराठवाड्यासाठी असलेल्या औरंगाबाद येथील रोगनिदान प्रयोगशाळेतही निदान झाले नसल्याने हे नमुने आता पुणे येथील विभागीय रोगनिदान (रोग अन्वेषण) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शासनाच्या प्रयोगशाळांमधील असुविधा यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. आता पुणे येथील अहवाल आल्यानंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, मात्र तोपर्यंत पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
अंथरवन पिंपरी येथे जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाल्यानंतर पशुपालकांमध्ये खळबळ उडाली. तर लोकप्रतिनिधी व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रानुसार अंथरवन पिंपरी व लगतच्या परिसरातील शेतकºयांच्या पाच शेळ्या, ३०-३२ कोकरे, मेंढ्या तसेच व ५ ते ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सतर्क झालेल्या पशुसंवर्धन विभागाने गावातील जनावरांवर उपचार करण्यासाठी मोहीम सुरु केली. ८ डॉक्टरांचे पथक गावात ठाण मांडून आहे. रविवारपर्यंत ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. तसेच इतर उपचारामुळे मागील दोन दिवसात जनावरे दगावली नसल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या मृत्यूचे दहा दिवसानंतरही कारण स्पष्ट झाले नाही. रोगाचे निदान होत नसल्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत. मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम आहे.
औरंगाबाद : निदान झाले नाही
दरम्यान ८ डॉक्टरांच्या पथकामार्फत सुरु असलेले उपचार व लसीकरणामुळे जनावरांचे मृत्यू रोखण्यात यश आले आहेत.
तसेच ज्या जनावरांना लागण झाल्याची शक्यता आहे अशा ९ गायी, ९ म्हशी, व ११ शेळ््यांवर रविवारी उपचार करण्यात आले आहेत.
औरंगाबादच्या प्रयोगशाळेत निदान न झाल्याने पुणे येथील प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.