बीडमध्ये बांधकाम मंत्र्यांचे ‘दणक्या’त स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:25 IST2017-11-22T23:22:55+5:302017-11-22T23:25:55+5:30
बेजबाबदार कारभाराचे आगार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बुधवारी चंपावतीनगरीत ‘दणक्या’त स्वागत केले. दिवसभर त्यांचा प्रवास खड्ड्यातूनच झाला.

बीडमध्ये बांधकाम मंत्र्यांचे ‘दणक्या’त स्वागत
बीड : बेजबाबदार कारभाराचे आगार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बुधवारी चंपावतीनगरीत ‘दणक्या’त स्वागत केले. दिवसभर त्यांचा प्रवास खड्ड्यातूनच झाला. आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी दोन दिवसांपासून बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली. परंतु गैरकारभारावर पडदा टाकण्यात त्यांना अपयश आले. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या सर्वच ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून सर्वसामान्य वाहनधारक रोज प्रवास करतात. हे खड्डे चुकवितांना अनेक अपघात झालेले आहेत. यामुळे अनेक लोकांचे प्राणही गेले आहेत.
लातूर जिल्ह्यातील अपघातही हा खड्डे चुकवितानाच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असेच अपघात बीड जिल्ह्यातील रस्त्यांवर झाले. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम त्यांच्याकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
विश्रामगृह केले चकाचक
बीडमधील शासकीय विश्रामगृह बांधकाम मंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आले होते.
मंगळवारीच विश्रमागृहाच्या इमारती, झाडांना रंगरंगोटी करण्याबरोबरच परिसरातील स्वच्छता करण्यात आली.
याआधी अनेक दिवसांपासून येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत होते.
खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट
बीड-परळी राज्य रस्त्यावर बुधवारी ठिकठिकाणी थातुरमातूर खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.
हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसून आले. कारण सकाळी बुजविलेले खड्डे दुपारी उखडले होते. हा प्रकार दिंद्रुडजवळ दिसून आला. या कामाची चौकशी करुन कारवाईची मागणी होत आहे.
पितळ उघडे पडण्याची अधिका-यांना भीती
मंत्री पाटील यांचा शासकीय दौरा निश्चित होताच बांधकाम विभागाकडून ते ज्या मार्गांवरून येणार आहेत, त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले जात होते.
हा घाट केवळ आपल्या गैरकारभाराचे पितळ बांधकाम मंत्र्यांसमोर उघडे पडू नये, यासाठीच केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.