महावितरण बिलाचा ग्राहकांना शॉक
बीड : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कमी व्हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटारी आहेत. अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. महावितरणच्या या वीजबिलाच्या शॉकने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत.
श्वानांना चर्मरोग
बीड : शहर व परिसरात अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांच्या वाढत्या संख्येचा मोठा त्रास शहरवासीयांना होत आहे. मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेले हे श्वान रहदारी करणाऱ्या व्यक्तींना भीतीदायक ठरू लागले आहेत. यातील अनेक श्वानांना चर्मरोगाची लागण झाल्याने ते भिंतीला अंग घासत बसलेले असतात. याचा शहरवासीयांना मोठा त्रास होऊ लागला आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.