पाण्याचा तुटवडा, जेवणाचा निकृष्ट दर्जा; आष्टीच्या कोविड केंद्रात कोरोनाबाधितांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:36 IST2020-10-12T17:31:18+5:302020-10-12T17:36:25+5:30
कोरोनाबाधीतांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला

पाण्याचा तुटवडा, जेवणाचा निकृष्ट दर्जा; आष्टीच्या कोविड केंद्रात कोरोनाबाधितांचे हाल
कडा : सोमवारी दुपारी अचानक आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी येथील सोयी सुविधेबद्दल विचारपूस करताच कोरोनाबाधीतांनी आमदारांसमोर समस्यांचा पाढाच वाचला.
आष्टी येथील कोविड केअर सेटरमध्ये सध्या पन्नास कोरोनाबाधित रूग्ण आहेत. येथे वैद्यकीय सेवा चांगल्या असून रुग्णांना त्या मिळत आहेत. मात्र, पाण्याचा तुटवडा आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याने कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. पिण्यासोबतच सांडपाणीसुद्धा चार दिवसांपासून उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे बाधित रुग्ण जास्त काळ केंद्राच्या परिसरातच थांबत आहेत. रुग्णांनी शासनाच्या नियमानुसार येथे सुविधा उपलब्ध नसल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांना सांगत होणारे हाल मांडले.
ना काढा ना अंडी
कोरोनाबाधित रुग्णांना केंद्रामध्ये काढा आणि अंडी देण्याचा नियम आहे. मात्र मागील अनेक दिवसापासुन जेवण पुरवत असलेला ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जेवणाचा दर्जा ही निकृष्ट आहे.
तत्काळ सुविधा द्या
कोरोनाबाधितांच्या जिवाशी न खेळता केंद्रात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या, जेवणाची प्रत शासनाच्या नियमानुसार असावी. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांना गैरसोय होत असेल तर कारवाईला सामोरे जावे लागले.
- आ. बाळासाहेब आजबे
सोशल मीडियावर द्वेषभावना पसरविणारा संदेश टाकल्याबद्दल गुन्हा दाखलhttps://t.co/Ni4nHieeHT
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 12, 2020