करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:40 IST2021-09-07T04:40:29+5:302021-09-07T04:40:29+5:30

बीड : करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. मात्र, संशयास्पद ...

Was there a pistol in Karuna Sharma's car? | करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

बीड : करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. मात्र, संशयास्पद वस्तू डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून, करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून जमावाविरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी ६ सप्टेंबर रोजी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, पिस्तूल ठेवले की होते याचे गूढ कायम आहे.

करुणा शर्माप्रकरणी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी विविध खुलासे केले. ते म्हणाले, करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखले तेव्हा काही महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून, धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहे. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका, असे म्हटले. यावेळी करुणा यांनी जातिवाचक शिवीगाळ केली, तर याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी यांच्यावर चाकूहल्ला केला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राआधारे विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून, चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी) विरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्रप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक केली असल्याची माहिती अधीक्षक राजा यांनी दिली.

दरम्यान, गाडीच्या डिकीत संशयास्पद वस्तू ठेवताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची पडताळणी सुरू असल्याचे अधीक्षक राजा यांनी सांगितले. करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून बेकायदेशीर गर्दी केल्याने कोविड नियमांचा भंग केल्याचा गुन्हा शंभर ते दोनशे जणांवर नोंद करण्यात आला.

....

दोषींवर कारवाईचा इशारा

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, अशा परिस्थितीत इतक्या सगळ्या घडमोडी झाल्या, यात पोलिसांकडून निष्काळजी झाली नाही कशावरून, या प्रश्नावर चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक आर. राजा यांनी दिला.

----------------------------

Web Title: Was there a pistol in Karuna Sharma's car?