बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:28+5:302020-12-27T04:24:28+5:30
शिरूर कासार : शहरातील हमरस्ते आपलेच असल्याच्या आविर्भावात वाहन चालक जिथे काम असेल तिथे कुणाला त्रास होईल ...

बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा
शिरूर कासार : शहरातील हमरस्ते आपलेच असल्याच्या आविर्भावात वाहन चालक जिथे काम असेल तिथे कुणाला त्रास होईल याची पर्वा न करता वाहने लावत होते. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांचा अख्खा फौजफाटा शनिवारी रस्त्यावर उतरला. पोलीस व्हॅनमधील स्पीकरवरून वाहने आडवे लावू नका, असे आवाहन करत दंडात्मक कारवाईचा इशारा दिला जात होता. शिरूर शहरात वाहतूक शिस्तीचा बोजवारा उडाला होता. जिथे काम असेल तिथेच कार्यालयासमोर , बँकेच्या दारात ,दुकानासमोर खरेदी होईपर्यंत तर हाॅटेलमधे जाऊन चहा, नाष्टा मोकळ्या मनाने उरकेपर्यंत दुचाकी तसेच चारचाकी वाहने कशीही आडवी तिडवी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते. याचा त्रास पायी चालणाऱ्या लोकांना होत होता. बोललेच तर अरेरावीची भाषा केली जायची ,हा सर्व त्रास निमूटपणे लोकांना सहन करावा लागत होता. यातून किरकोळ अपघात, वाद होत होते. अखेर या सर्व बाबींची दखल पोलिसांनी घेत शनिवारी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक डॉ .रामचंद्र पवार आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. गाडीमधील स्पीकरवरून सूचना देत होते .
यापुढे रस्त्यावर वाहन उभे केल्यास संबंधित वाहन धारकांना तसेच दुकानदार व हाॅटेल चालकांवर देखील कारवाई केली जाईल असे बजावले. बेशिस्त वाहतूक व पार्किंगमुळे शहराचे सौंदर्य हरपून तर जातेच शिवाय छोटे -छोटे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटनाच घडू नये यासाठी आपण आज रस्त्यावर उतरल्याचे पाे. नि. सिध्दार्थ माने यांनी सांगितले. या उपर शिस्तीचा भंग केल्यास वाहनधारक आणि दुकानदार ,हाॅटेल चालक यांचेवर कारवाई अटळ असल्याचेही स्पष्ट केले.
शहरात पार्किंगचा अभाव
तालुक्याचे ठिकाण असल्याने सतत वर्दळ असतेच परंतु शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था आतापर्यंत झालेली नाही परिणामी वाहन चालक जेथे सोयीचे वाटेल तेथे आपले वाहन उभे करतो हे देखील सत्य नाकारता येत नाही. सुविधाच नसल्याने नगरपंचायत समोरील चौकाला पार्किंगचे स्वरूप आले आहे .