आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:16+5:302021-02-05T08:25:16+5:30
बीड : विविध प्रशासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा होणारा छळ आणि त्यांचे केले जाणारे अपमान चिंताजनक आहेत. ...

आंदोलनाचा इशारा
बीड : विविध प्रशासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा होणारा छळ आणि त्यांचे केले जाणारे अपमान चिंताजनक आहेत. यासंदर्भातल्या तक्रारी दबक्या आवाजात ऐकायला मिळतात. दरम्यान, असे होऊ नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी दिला.
महंत राधाताई सानप यांचे कीर्तन
बीड : शहरातील शिवशंभो सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने फुलाईनगर, संत सावता माळी चौक येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महंत राधा महाराज सानप यांचे कीर्तन होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विठ्ठल मंदिरात महाप्रसाद वाटप होणार आहे.
अनेक भागांत अंधार
पाटोदा : शहरातील अनेक विद्युत खांबांवर दिवे नसल्याने परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व खांबांवर तत्काळ विद्युत दिव्यांची व्यवस्था करून अंधार दूर करण्याची मागणी होत आहे. मात्र, महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
वडवणी : वडवणी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे व दरोड्याचे प्रमाण मागील काही महिन्यांत वाढले आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी होत असून, दाखल गुन्ह्यांचा छडा तातडीने लावावा व चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी रहिवाशांमधून जोर धरू लागली आहे.
साहित्य रस्त्यावरच
बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत.
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
मांजरसुंबा : बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील बसस्थानकात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. स्वच्छतेची मागणी आहे.