Walmik Karad ( Marathi News ) : वाल्मीक कराड याची आज पोलीस कोठडी संपली. आज कोर्टात कराड याला हजर केले, कोर्टाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कराड याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. 'कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, पोलिसांच्या बेडीतून कोणीही सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली.
वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी
आमदार सुरेश धस म्हणाले, सभागृहात संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या प्रकरणात पोलिसांनी आणि एसआयटीने काम केले आहे. या प्रमाणे आता कोर्टही ऑर्डर करत आहे, राज्य सरकारने जी एसआयटी नेमली आहे. त्यांनी त्यांचं काम दाखवलं आहे, या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असंही आमदार धस म्हणाले.
"कायद्याचा कचाट्यातून कोणही सुटणार नाही. पोलीस यंत्रणा आहे, आम्ही काही बोलून काही होत नसते. पोलीस यंत्रणेने जी कडी जोडली आहे, यात जे लोक येतील ते अडकतील. कायद्यापेक्षा कोणही मोठा नसतो, असंही आमदार सुरेश धस म्हणाले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकील आणि वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज कोर्टाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसा अर्जही पोलिसांनी केजच्या वरिष्ठ कोर्टाकडे केल्याची माहिती आहे. त्यामुळे मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर एसआयटीकडून पुन्हा कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.
आठ आरोपींना मकोका
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आऱोपींवर मकोका कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी कराड याला या गुन्ह्यात घेण्यात आले नव्हतं. त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मीक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून कराडवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.