लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आले आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. धनंजय मुंडे यांनीच तशी कबुली दिली होती. त्यामुळे मुंडेदेखील अडचणीत आले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मीक कराडची ओळख होती. बीड जिल्ह्यात तर पक्षाचे पद नसतानाही तो प्रशासनात रूबाब गाजवत होता. याला धनंजय मुंडे यांचेच पाठबळ असल्याचा आरोप भाजपचे आ. सुरेश धस, शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. प्रकाश सोळंके यांनी केला होता. आ. सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडे आणि कराड यांचे व्यावहारिक नाते कसे आहे, हे सांगितले होते. कराडने वाहनचालक, मावस भाऊ, दुसरी पत्नी अशा अनेकांच्या नावावर बीडसह राज्यभरात, परदेशात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही झाला आहे.
खंडणी मागणे, धमक्या देणे, अपहरण करून खून करण्यासारखे गंभीर गुन्हे कराड व त्याच्या साथीदारांनी केले. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने केले, असे आरोप विरोधक करत असून, सर्वांचा निशाणा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे आहे.
चाटे राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष
हत्या प्रकरणात कराडसह विष्णू चाटे याचेही नाव आहे. चाटे आणि कराड हे मावस भाऊ लागतात. हाच चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष होता.
मुंडे यांच्या शिफारशीवरून...
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात समन्वयासाठी एक समिती तयार केली. यात पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून परळी मतदारसंघातील अध्यक्ष कराडला केले होते. पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याच्या दिवशी मंत्री पंकजा मुंडे यांनी 'ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, असे वाल्मीक कराड' असे म्हणत कराडचा नामोल्लेख केला होता.
देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर : मुख्यमंत्री
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी चोख तपास केला. योग्य वेळेत संपूर्ण पुराव्यासह आरोपपत्र दाखल केल्याने आता कोर्टात ती केस फास्ट ट्रॅकवर चालवावी. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.