काेरोनात कामचुकारपणा; १५ जणांना मूळ पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:51+5:302021-06-18T04:23:51+5:30
लोकमत इम्पॅक्ट बीड : जिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोना वॉर्डमध्ये विविध कामांसाठी घेतले होते; परंतु काही कर्मचारी ...

काेरोनात कामचुकारपणा; १५ जणांना मूळ पदस्थापना
लोकमत इम्पॅक्ट
बीड : जिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोना वॉर्डमध्ये विविध कामांसाठी घेतले होते; परंतु काही कर्मचारी कामचुकारपणा करीत घरूनच कारभार हाकत असल्याचे 'लोकमत'ने उघड केले होते. यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी या सर्वच कर्मचाऱ्यांना कोरोनातून काढत मूळ ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारपासून ते मूळ ठिकाणी हजरही झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे मनुष्यबळही अपुरे पडत होते. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने आदी विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोना वॉर्डमध्ये काम करण्यास सांगितले होते. त्यांच्याकडे ऑक्सिजन खाटांचे नियोजन, समुपदेशन, रुग्णांना मदत, गंभीर व अति गंभीर रुग्णांना ऑक्सिजन खाट, बायपॅप आणि व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती; परंतु हे कर्मचारी तासभर काम करून गायब होत असल्याचे बुधवारी उघड झाले होते. तर रविवारचे कर्मचारी घरूनच कारभार हाकत होते. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी याची गंभीर दखल घेत डॉ. राठोड यांना या सर्वांना मूळ पदावर परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ.राठोड यांनी तीन डॉक्टर आणि १२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर राहून संबंधित विभागात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी हे सर्व कर्मचारी आपआपल्या जागेवर रूजू झाले. आता येथे तरी ते नियमित काम करतात का, हे वेळच ठरविणार आहे.
--
सीईओंकडे जाणार निलंबनाचा प्रस्ताव
कोरोना महामारीत ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांची हलगर्जी 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणली. आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाणार आहे. हे सर्व लोक कंत्राटी असल्याने त्यांची थेट हकालपट्टी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
---
ऑक्सिजन नियोजनासाठी नियुक्त केलेले सर्वच डॉक्टर, कर्मचारी हे त्यांच्या मूळ ठिकाणी परत केले आहेत. सर्वांनीच गुरुवारपासून आपआपल्या विभागात काम करण्यास सुरुवात केली आहे. हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड.
===Photopath===
170621\17_2_bed_4_17062021_14.jpg
===Caption===
१४ जून रोजी लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त.