संतद्वयांच्या पुण्य स्मरणाने टाळ-मृदंग खणखणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:35+5:302021-02-05T08:22:35+5:30
गावोगावी सप्ताहाचे आयोजन शिरूर कासार : ऐश्वर्य संपन्न तथा व शांतीब्रम्ह ओळख असलेले संत भगवानबाबा आणि वैराग्यमूर्ती ...

संतद्वयांच्या पुण्य स्मरणाने टाळ-मृदंग खणखणले
गावोगावी सप्ताहाचे आयोजन
शिरूर कासार : ऐश्वर्य संपन्न तथा व शांतीब्रम्ह ओळख असलेले संत भगवानबाबा आणि वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात टाळ मृदंग खणखणू लागले आहेत. श्रीक्षेत्र भगवानगड गडावर बाबांच्या समाधीचे विधिवत पूजन करण्यात आले. तर गावोगावी संत मूर्ती तथा प्रतिमा पूजन करण्यात आले. ५० वर्षाचा काळ उलटला असला तरी संतांची कीर्ती तथा त्यांच्या आठवणी या ताज्या असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान गडावर महंत डॉ. न्यायाचार्यांच्या अधिपत्याखाली पुण्यतिथी सोहळा पार पडला. संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीपासून संत वामन भाऊंच्या पुण्यतिथीपर्यंत गावोगावी सप्ताह, कीर्तन, प्रवचन, कथा आदी कार्यक्रम सुरू असतात. लाखो भाविकांचे भक्ती व शक्तिपीठ असलेले संतद्वय आजही भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. गावोगावी त्यांची मंदिर उभारली असून भाविक आपली श्रध्दा ठेवतात.
गडावर मुख्य कार्यक्रम प्रधान आचार्य नारायण स्वामी यांनी समाधी पूजन केले. नंतर भाविकांना प्रसाद देण्यात आला. शिरूर येथील धाकट्या अलंकापुरीत महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी कार्यक्रम झाला. यावेळी कृष्णा महाराज यांचे कीर्तन झाले व वामनराव डोंगरे यांनी प्रसाद वाटप केला. बोरगाव चकला येथे सप्ताह सुरू आहे, वार्णी, आनंदगाव, बावी, भालगाव, तागडगाव, मिडसांगवी, दहिवंडी, खोकरमोह, रायमोह, लोणी आदी गावांत संतांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम सुरू आहेत. फुलसांगवी येथे पुण्यतिथीनिमित्ताने वामनभाऊ मंदिरात सप्ताह सुरू आहे. रविवारी येथे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांची कीर्तनसेवा झाला. खांबा येथेदेखील डॉ. नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी कार्यक्रम होत आहे. येथे विवेकानंद शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून संगीत भागवत कथा सुरू आहे. प्रसंगरूप पात्र तयार केली जात असल्याने भाविक मंत्रमुग्ध होऊन कथा श्रवणाचा लाभ घेत आहे. एकंदरीत संतद्वयांची पुण्यतिथी भक्तिसाधनेसाठी महापर्वणी म्हणून या कार्यक्रमात भाविक सहभागी होत आहेत.