आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 13:28 IST2021-01-24T13:28:49+5:302021-01-24T13:28:49+5:30
सोमवार दि.१८ जानेवारी रोजी अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन
आष्टी : तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील वीर जवान शरद दत्तोबा चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर आपल्या लोणी सय्यदमीर या गावी आले होते. सोमवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास मोटारसायकल घेऊन बाहेर जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला धडकल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात लोणी सय्यदमीर येथे शनिवार दि .२३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरद चांदगुडे हे २००४ मध्ये अहमदनगर येथे फौजमध्ये भरती झाले होते. भरती झाल्यानंतर त्यांनी जम्मू, राजस्थान, बेळगाव, पंजाब येथे आपले कर्तव्य निभावले होते. शरद चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. सोमवारी (ता.१८) उशिरा काही कामानिमित्ताने ते दुचाकी घेऊन बाहेर जात असताना अंधार असल्याने रस्त्याच्या बाजूच्या वृक्षाला धडक बसली होती. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना प्रथम अहमदनगर व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (२३) सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान शरद चांदगुडे यांना आई, वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ बाळासाहेब आजबे, माजी आ साहेबराव दरेकर, तहसिलदार शारदा दळवी, जयदत्त धस, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, आर्मीचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरद चांदगुडे यांचा भाऊ बाळासाहेब चांदगुडे हे पण आर्मीमध्ये कायरत आहेत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.