बीड : परळी, अंबाजोगाई तालुक्यांत दहशत निर्माण करण्यासह इतर जिल्ह्यांत जाऊन गुन्हेगारी करणारा वाल्मीक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवर दरोडा, अपहरण, खंडणी असे अनेक गंभीर स्वरूपाचे तब्बल ४३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. हाच गोट्या महादेव मुंडे खून प्रकरणात चर्चेत आला असून, त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याच गाेट्यावर बीडपोलिसांनी मोक्का लावलेला असला तरी तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीतील मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मंगळवारी तो पुन्हा चर्चेत आला.
गोट्या ऊर्फ ज्ञानोबा ऊर्फ ग्यानबा मारुती गित्ते (रा. नंदागौळ, ता. परळी) असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणावेळी गोट्या हजर होता. त्याच्या फिर्यादीवरूनच शरद पवार गटाचा बबन गित्ते याच्यावर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. यातही तो फरार आहे; महादेव मुंडे खून प्रकरणात अनेकांनी गोट्यावर जाहीरपणे संशय घेतला आहे.
व्हायरल झालेले व्हिडीओ एका व्हिडीओमध्ये तो बबन गित्तेच्या घरासमोर ‘राम नाम सत्य है’ असे म्हणत आरती करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत रेल्वे रुळांवर बसून वाल्मिक कराडला ‘दैवत’ असल्याचे सांगतो. गत विधानसभा निवडणुकीत मतदान करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.
न्यायालयीन बाब असल्याने आम्हाला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही, तसेच काय प्रसिद्ध झाले, हेदेखील मला माहिती नाही. - अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी, परळी