वैद्यनाथ मंदिर बंद; आर्थिक उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:09+5:302021-07-21T04:23:09+5:30
मंदिर परिसरातील बेल, फुल विक्रेते, खेळणी दुकाने, प्रसाद साहित्य, हॉटेल्स या दुकानावर वरील आर्थिक उलाढाल ठप्प ...

वैद्यनाथ मंदिर बंद; आर्थिक उलाढाल ठप्प
मंदिर परिसरातील बेल, फुल विक्रेते, खेळणी दुकाने, प्रसाद साहित्य, हॉटेल्स या दुकानावर वरील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच वैद्यनाथ मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. दर सोमवारी श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असत, परंतु कोरोना पार्श्वभूमीवर सध्या वैद्यनाथ मंदिर बंद आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल का व भाविकांचे दर्शन होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैद्यांचाच नाथ वैद्यनाथ व वैद्यनाथांच्या स्पर्शाने सर्व रोग दूर होतात असा महिमा आहे. त्यामुळे वैद्यनाथाचे मंदिर दर्शनासाठी भाविकांकरिता उघडावे, अशी मागणी हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केली आहे.
देशातील अनेक राज्यांतील मंदिरे उघडण्यात आली आहे परंतु महाराष्ट्रातील मंदिर उघडण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, मंदिरे उघडावीत अशी मागणीही आश्विन मोगरकर यांनी केली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेले हॉटेल्स प्रसाद साहित्य, खेळणी, मूर्ती दुकाने ,बेल फुल विक्रते यांना मंदिर बंदचा आर्थिक फटका बसला आहे.
खेळणीच्या दुकानावर खरेदीसाठी दर श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी असते पण सध्या मंदिर बंद असल्यामुळे या ठिकाणी विक्री होत नाही.
रामेश्वर गडेकर ,दुकान चालक वैद्यनाथ मंदिर परिसर परळी.
वैद्यनाथ मंदिर बंद असल्यामुळे परराज्यातील भाविक येत नाहीत. त्याचा मंदिर परिसरातील व शहरातील हॉटेल व्यवसायिक, ऑटोरिक्षा, भक्त निवास, लॉजेसच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे..उलाढाल ठप्प झाली आहे.
श्याम बुद्रे, हॉटेल व्यवसायिक वैद्यनाथ मंदिर परिसर.
परळी तालुक्यात रोजचे कोरोना रुग्ण शून्यावर आलेत. १८ वर्षावरील बहुसंख्य नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिक काळजी घेऊन आपले व्यवहार, प्रवास, सार्वजनिक कार्यक्रम करत आहेत. मात्र सण, उत्सव सुरु होत असताना मंदिरे मात्र बंद आहेत. मंदिरावर पोट असणारे पुजारी, पूजासाहित्य विक्रेत्यांची परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. शाळासुद्धा आता अनलॉक होताना मंदिरे मात्र कुलुपातच आहेत. भाविकांचा जास्त अंत न पाहता शासनाने मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत.
अश्विन मोगरकर,परळी.