'वैद्यनाथ' कर्ज मंजूर प्रकरण : बीड जिल्हा बँक अध्यक्षांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 16:06 IST2020-10-23T16:04:15+5:302020-10-23T16:06:10+5:30
'Vaidyanath sugar factory' loan sanction case उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्या फिर्यादीवरून जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह बँक अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

'वैद्यनाथ' कर्ज मंजूर प्रकरण : बीड जिल्हा बँक अध्यक्षांवर गुन्हा दाखल
बीड : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला कर्ज देण्यासाठी मंगळवारी जिल्हा बँकेची बैठक झाली होती. यामध्ये वैद्यनाथ कारखान्याला मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणाबाबत संचालक चंद्रकांत शेजूळ यांनी तक्रार केली होती. यावरून जिल्हा उपनिबंधकांनी बैठकीला उपस्थितीत असलेल्यांची माहिती मागितली होती. मात्र, ती माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्या फिर्यादीवरून जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह बँक अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यनाथ कारखान्याला २५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. मात्र, संचालक चंद्रकांत शेजुळ यांनी या बैठकीला संचालकांची संख्या अपुरी असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केली. त्यानुसार बैठकीच्या वेळी उपनिबंधक प्रवीण फडणीस हे जिल्हा बँकेत पोहोचले. मात्र, त्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक तुम्ही येण्यापूर्वीच झाल्याचे सांगितले. फडणीस यांनी संचालकांच्या उपस्थितीची माहिती मागितला असता त्यांना ती उपलब्ध करून देण्यात आली नाली. त्यामुळे फडणीस यांनी या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल केला.