कोविडचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:34+5:302021-03-21T04:32:34+5:30
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून तालुक्यातील विविध शासकीय - निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, नागरिक कोव्हॅक्सिन लसीकरणाचा ...

कोविडचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरण करा
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून तालुक्यातील विविध शासकीय - निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, नागरिक कोव्हॅक्सिन लसीकरणाचा लाभ घेत आहेत. शनिवारी आ. लक्ष्मण पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लसीकरणाचा सविस्तर आढावा घेतला. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून महामारीला न घाबरता कोविडचा प्रतिकार करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आ. पवार यांनी केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ विभागातून केले जाणारे लसीकरण, अँटिजन, आरटीपीसीआर चाचणीची सुविधा व रोजचा लसीकरण पुरवठा तसेच शिल्लक याबाबत आ. पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयाने कोरोना चाचण्यांवर जास्तीत जास्त भर दिला असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील एकूण ६ केंद्रांवर ही लसीकरण मोहीम सुरू असून सोमवार ते शनिवार दररोज तालुक्यात २०० ते २५० नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. नोंदणी झाल्यावर कोविड -१९ लसीकरण विभागात संबंधित नागरिकांना शासनाच्या आदेशानुसार ही लस मोफत दिली जात असल्याचे या वेळी डॉ. राजेश शिंदे यांनी सांगितले. या वेळी डॉ. राजेश शिंदे, डॉ. सराफ, डॉ. राजेंद्र आंधळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
५१२२ नागरिकांना लस
दरम्यान, आरोग्य विभागाने चाचण्या आणि लसीकरणावर भर दिला असून त्यासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे, या लसीकरण विभागात १६ जानेवारी ते २० मार्चपर्यंत जवळपास ५ हजार १२२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.
===Photopath===
200321\sakharam shinde_img-20210320-wa0040_14.jpg
===Caption===
गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी आ. लक्ष्मण पवार यांनी लसीकरणाचा आढावा घेत पाहणी केली.