अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनाविना उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:34+5:302021-03-07T04:30:34+5:30
बीड : येथील अग्निशमन विभागात खासगी एजन्सी मार्फत भरण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील दहा महिन्यांपासून वेतन झालेले नाही. सध्या ...

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनाविना उपासमार
बीड : येथील अग्निशमन विभागात खासगी एजन्सी मार्फत भरण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील दहा महिन्यांपासून वेतन झालेले नाही. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एजन्सी चालक व पालिका एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहे. याचा त्रास या कर्मचाऱ्यांना होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड नगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभाग कार्यरत आहे. येथे एका खासगी एजन्सी मार्फत फायरमन ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहेत. या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले. तसेच आगीच्या घटनांमध्येही जीवावर उदार होत आग आटोक्यात आणली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिवभोजन थाळीवर भूक भागविली. लॉकडाऊनमध्ये या कर्मचाऱ्यांचे आणि कुटुंबीयांची उपासमार झाली. या वेतनाबाबत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी, आमदार, अग्निशमन विभाग प्रमुख यांच्याकडे वारंवार मागणी केली, परंतु अद्यापही त्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. तब्बल दहा महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. वेतनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
एजन्सी चालकांची मनमानी
लातूर येथील फॉरेटियर एक्स सर्व्हिस मॅन या खासगी एजन्सीकडून हे कंत्राटी कर्मचारी पुरविण्यात आलेले आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना कसलेच अधिकृत कागदपत्रे दिलेली नाहीत. केवळ ७ हजार ८०० रूपये वेतन तोंडी ठरविण्यात आले. ते देखील अद्याप मिळालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याचे १५ हजार रूपयांने पालिकेकडून वेतन घेऊन कर्मचाऱ्यांना केवळ ७ हजार ८०० रूपये देण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले.
कोट
पालिकेच्या फंडामुळे वेतन राहिले आहे. वसुली चांगली झाल्यास वेतन होईल. याबाबत आणखी माहिती मुख्याधिकारी यांना विचारावी.
बी. ए. धायतडक, प्रमुख अग्निशमन विभाग न. प. बीड