अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:36+5:302021-02-05T08:25:36+5:30
बीड : शहरातील शाहूनगर, सहयोगनगर, मोंढा रोड, माळीवेस, अंबिका चौक, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, ...

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बीड : शहरातील शाहूनगर, सहयोगनगर, मोंढा रोड, माळीवेस, अंबिका चौक, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला असतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, पालिकेने विशेष मोहीम राबवत स्वच्छता करण्याची मागणी आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
पाटोदा : तालुका आणि परिसरात सध्या वीजपुरवठा नेहमीच खंडित होत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संताप दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. याकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
बीड : बीड ते गेवराई, वडवणी, मांजरसुंबा, पाटोदा मार्गावर खासगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. वाहतूक शाखा पोलीस व आरटीओ कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर कारवाईची मागणी होत आहे.
गेवराई स्थानकासमोर नो पार्किंगचा बोजवारा
गेवराई : येथील बसस्थानकासमोर नो पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होतो. तसेच नागरिक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ नो पार्किंगची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
खासगी वाहतूक
जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव आणि परिसरात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या ग्रामीण प्रवाशांकडून जादा भाडे घेतल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
तालखेड : काही दिवसांपूर्वी बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होते. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेक वेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. अनेकदा पशुपालकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.