लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:43+5:302021-04-12T04:30:43+5:30
धारूर : तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली ...

लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार
धारूर
: तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तेलगाव व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पूर्ववत ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
उपळी येथील कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी लोनवळ, तेलगाव, नित्रुड आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला कॅनालव्दारे येत होते. मात्र, कॅनाॅलमध्ये पाणी येण्यापूर्वी लोनवळ तलावात पाणी यायचे. हा तलाव भरल्यानंतर तेथून पुढे कालव्यातून तेलगाव, लोनवळ, नित्रुड येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. मात्र, तलाव भरण्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत पाणी पाळी संपते. त्यामुळे कॅनालमध्ये पाणी येतच नव्हते. पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यातच शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावीच लागत होती. शिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना कमांड खाली येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव लगड यांनी उपळी तलावातून येणारे पाणी थेट तेलगावकडे जाणाऱ्या कॅनालमध्ये सोडवण्यासाठी तलावात भूमिगत जलवाहिनी करून त्याव्दारे कॅनालमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. सन २०१८ पासून लगड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या मागणीसाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेलगाव येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. तसेच आ. प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन लगड यांनी त्यांच्याकडे जलवाहिनीचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर या कामासाठी तरतूद झाली. या निर्णयाचे काॅ. दत्ता डाके, डाॅ. सुरेंद्र कलंत्री, विष्णूपंत लगड, नवनाथ राठोड, बबन भिसे आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत केले.
जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट
आ. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपदा मंत्र्यांनी जलवाहिनीच्या कामास मंजुरी देत तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ. प्रकाश सोळंके दिली.
शेकडो हेक्टरला होणार लाभ
या कामास येत्या काही दिवसात सुरूवात होऊन लवकरच काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे तेलगाव, लोनवळ, नित्रुड व लगतच्या शिवारातील हजारो हेक्टर शेत जमिनी पूर्ववत जलसिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी पिके घेणे सुलभ होणार आहे.