कुंपणच शेत खातंय; बीड पालिकेनेच लावले अनधिकृत बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:43 IST2020-01-09T11:40:47+5:302020-01-09T11:43:30+5:30
बीड शहरात केवळ २४ ठिकाणी अधिकृत बॅनर लावण्याची परवानगी आहे.

कुंपणच शेत खातंय; बीड पालिकेनेच लावले अनधिकृत बॅनर
- सोमनाथ खताळ
बीड : बीड पालिकेने जनहितार्थ स्वच्छ सर्वेक्षण व इतर उपक्रमांची माहिती देणारे बॅनर बीड शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र, हे बॅनरच अनधिकृत ठिकाणी लावल्याचे समोर आले आहे. बीड शहरात केवळ २४ ठिकाणी अधिकृत बॅनर लावण्याची परवानगी आहे. यावरून ‘कुंपणच शेत खातंय’ अशी परिस्थिती झाल्याचे दिसत आहे.
सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० चालू आहे. यात बीड पालिकेने सहभाग नोंदविलेला आहे. याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी बॅनर लावून जनजागृती करण्याच्या सुचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे बीड पालिकेने शहरात ५० ठिकाणी बॅनर लावण्याचे नियोजन केले आहे. पैकी १५ ठिकाणी बॅनर लावण्यातही आले आहेत. याची खोलवर जावून माहिती घेतली असता शहरात केवळ २४ ठिकाणीच बॅनर लावण्याची अधिकृत परवानगी आहे. या सर्व ठिकाणी राजकीय व विविध कार्यक्रमांचे आगोदरच बॅनर लागलेले आहेत. त्यामुळे पालिकेने लावलेले बॅनर हे सर्वच अनाधिकृत असल्याचे समोर आलेले आहे.
विशेष म्हणजे अनाधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची जबाबदारी ही स्वच्छता विभागाची आहे. मात्र, हेच बॅनर खुद स्वच्छता विभागाने लावले आहेत. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रम्ह ज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ अशी काहीशी परिस्थिती पालिकेची झाली आहे. इतरांवर गुन्हे दाखल करणारी पालिका आता स्वत:च नियमांची पायमल्ली करीत असल्याचे समोर आले आहे. कुंपणच शेत खात असल्याने सामान्यांनी अपेक्षा ठेवायची कोणाकडून? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, स्वच्छता निरीक्षकांना याबाबत विचारणा केली असता शासनाचे आदेश असल्याने हे बॅनर लावल्याचे सांगितले. परंतु त्यांना अनाधिकृत बॅनर लावा, अशा सुचना आहेत का? असे विचारले असता त्यांनी शांत राहणे पसंद केले. त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यावरून पालिकाच नियम पायदळी तुडवून सामान्यांवर कारवाईचा बडगा उगरत असल्याचे दिसून येत आहे.
पालिकेवर गुन्हा नोंद होणार का?
यापूर्वी पालिकेने अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. आता पालिकेनेही अनाधिकृत बॅनर लावले आहेत. आता त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार की यातून पळवाट काढणार, हे वेळच ठरविणार आहे.
परवानगी घेतलेली नाही
बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. शासनाच्या सुचना असल्याने बॅनर लावलेले आहेत. ५० ठिकाणी लावायचे असून १५ ठिकाणी लावले आहेत. - भागवत जाधव, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद बीड