कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:28+5:302021-01-09T04:28:28+5:30
बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील ...

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
बीड : नगर ते जामखेड मार्गावरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे दुचाकीला कार (एमएच-४३ डी-८०२६)ने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील यादव अंबादास दुसगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू
बीड : शहरात वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात असून, शहर ठाण्यांतर्गत वर्षभरात १,१६३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापोटी २ लाख ६५ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सीट बेल्ट, ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, कागदपत्रांची तपासणी यासह इतर वाहनांच्या नियमावलीचा समावेश आहे. शुक्रवारी पोलीस शिपाई ए.ए. सय्यद, भागवत घोडके यांनी वाहन तपासणी मोहीम सुरूच ठेवली.
जुन्या वादावरून मारहाण
परळी : शहरातील बरकतनगर येथील नाझिया हबीब पठाण यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शेख रफिक शेख रज्जाक, शेख तब्बो शेख रफिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोना. देशमुख तपास करीत आहेत.
डोंगर जाळण्याचे प्रकार
बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डोंगररागांवर आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले आहेत. त्यामुळे गवत चांगले येते, अशी गैरसमजूत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे.
डासांची उत्पत्ती वाढली
वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
कापसाची वेचणी सुरूच
बीड : कापूस पिकाच्या दोन वेचण्यांमध्ये उत्पादन निघाले. दरम्यान, फरदड कापसाची वेचणी करण्यावरदेखील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बोंडअळीसारखा प्रकार वाढू नये म्हणून फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
क्रीडांगणाची दुरवस्था
बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी काही ठिकाणची दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तात्काळ सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.