माजलगावात चोरीच्या दोन घटना, पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:43+5:302021-01-10T04:25:43+5:30
गजानननगरमध्ये गजानन महाराज मंदिरासमोर रामेश्वर भंडारी यांचे घर असून, ते गुरुवारी सकाळी पत्नीसह आपल्या मुलीकडे वडवणी येथे गेले ...

माजलगावात चोरीच्या दोन घटना, पोलिसांपुढे आव्हान
गजानननगरमध्ये गजानन महाराज मंदिरासमोर रामेश्वर भंडारी यांचे घर असून, ते गुरुवारी सकाळी पत्नीसह आपल्या मुलीकडे वडवणी येथे गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा उचलत रात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. घरातील सर्व बॅग, कपाट, डबे आदी अस्ताव्यस्त पसरवून कपाटातील नगदी ५० हजार रुपये, तीन अंगठ्या व कानातील झुंबर, असे जवळपास दोन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजता शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत रामेश्वर भंडारी यांना फोनद्वारे माहिती दिली. शनिवारी सकाळी या चोरीप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
फुलेनगरातही चोरी
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुलेनगर भागातील रहिवासी, रापमचे वाहक विठ्ठल विश्वनाथ बोबडे हे गुरुवारी सकाळी ४ वाजता गावाला जाणार म्हणून उठून खाली आले असता, चोरट्यांनी खिडकीतून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल व नगदी ५ हजार रुपये, असा २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत शनिवारी सकाळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
माजलगाव शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरीची तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांनी २-२ दिवस चकरा मारल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. कोणाचा तरी दबाव आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येत आहे. विठ्ठल बोबडे यांच्यावर सुटी घेऊन पोलीस ठाण्याचे खेटे मारण्याची वेळ आली.