कोरोनावर मात करता-करता आता एक वर्षाचा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. लसीकरणाची तयारी वेगात सुरू असताना कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत नाही. बीड जिल्ह्यात बुधवारी २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात भट गल्ली, अंबाजोगाई येथील ६३ वर्षीय महिला तसेच आनंदगाव (ता. केज) येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच बुधवारी ६९९ संशयितांची तपासणी करण्यात आली. यातील ६४५ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले, तर नवे ५४ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४, आष्टी ८, बीड २६, गेवराई, परळी, पाटोदा तालुक्यातील प्रत्येकी ३, केज ४, माजलगाव, शिरूर व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७ हजार २१८ झाली आहे. तर, १६ हजार ३७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ५४५ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
दोघांचा मृत्यू, तर ५४ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST