हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:12+5:302021-02-05T08:24:12+5:30
(३१ बीइडीपी १० : महाराष्ट्रातील ४५ गिर्यारोहकांनी कोकणकडा येथे ७३ फूट लांबीचा तिरंगा फडकावला, ३१ बीइडीपी ११ : हरिश्चंद्रगडाच्या ...

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला तिरंगा
(३१ बीइडीपी १० : महाराष्ट्रातील ४५ गिर्यारोहकांनी कोकणकडा येथे ७३ फूट लांबीचा तिरंगा फडकावला, ३१ बीइडीपी ११ : हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडा येथे विश्वविक्रमाला गवसणी घालणारे गिर्यारोहक)
अंबाजोगाईच्या नागेश जोंधळेसह ४५ गिर्यारोहकांची विश्वविक्रमाला गवसणी
अंबाजोगाई : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांतून आलेल्या ३६० एक्सप्लोररच्या ४५ ट्रेकर्सच्या ग्रुपने हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडा येथे सर्वांत मोठ्या आकाराचा तब्बल ७३ फूट लांबीचा तिरंगा ध्वज फडकावून, तसेच राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. कोकणकड्यावर केलेल्या विक्रमाची ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ व ‘इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. यावेळी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे (सोलापूर), सिनेअभिनेत्री मीरा जोशी (मुंबई) यांच्यासह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नागेश जोंधळे, राहुल बनसोडे (नाशिक) यांच्यासह ४५ गिर्यारोहकांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.
यावेळी कोकणकडावर ध्वजवंदन समारंभानंतर उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना नागेश जोंधळे म्हणाले, आयुष्य जगत असताना आनंदी, निरोगी व तणावमुक्त राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी ध्येय असणाऱ्या गुरुजनांचे व व्यक्तींची प्रेरणा घेत त्यांचे मार्गदर्शन घेणे, चांगला मित्रपरिवार असणे, आदर्श दिनचर्या, सृजनशील ज्ञानार्जन व आधुनिक युगातील कौशल्य हस्तगत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे (सोलापूर) यांनी प्रास्ताविक केले. या तीनदिवसीय ट्रेकिंग मोहिमेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून बीड, नांदेड, नाशिक, सोलापूर, नंदुरबार, धुळे, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, मुंबई, नागपूर येथील ८ ते ७० वयोगटातील एकूण ४५ गिर्यारोहक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अंबाजोगाईकरांची मान उंचावणारी कामगिरी
अंबाजोगाई येथील नागेश जोंधळे हे मागील एक दशकापासून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. कोकणकडा येथील मोहिमेत ते सहभागी झाले. भारतीय प्रजासत्ताकदिनी तरुणांना प्रेरित करीत मोहिमेत सहभागी होऊन हा विश्वविक्रम प्रस्थापित केल्यामुळे जोंधळे यांनी अंबाजोगाईकरांची मान जगात उंचावली आहे. - रचना सुरेश मोदी, नगराध्यक्षा, अंबाजोगाई. अभिमानाचा क्षण..
भारतीय तिरंगा अतिशय उंच अशा कोकणकड्यावर फडकताना अतिशय आनंद वाटत होता. प्रत्येकासाठी हा क्षण अभिमानाचा होता. ही मोहीम युनायटेड नेशन्सच्या गोल्ससाठी समर्पित असल्याचे एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे यांनी सांगितले.