इतर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर माजलगावात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:38+5:302021-04-11T04:33:38+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : माजलगाव तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने व या ठिकाणी दोन ...

इतर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर माजलगावात उपचार
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : माजलगाव तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने व या ठिकाणी दोन खासगी कोविड सेंटर असल्याने आजूबाजूला असलेल्या इतर तालुक्यातून व जिल्ह्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण माजलगावात येत आहेत. आजूबाजूचे कोविड सेंटर फुल्ल होत आहेत.
माजलगाव तालुक्यात मागील एक वर्षाच्या काळात जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या मानाने कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी होती. परंतु खबरदारीचे उपाय म्हणून या ठिकाणी शासकीय कोविड सेंटरमध्ये जवळपास १०० रुग्णांची चांगल्या पद्धतीने सोय होईल, अशी इमारत घेतली व त्याच बरोबर अनेक मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात आली होती. त्याच बरोबर दोन खासगी रुग्णालयास कोविड सेंटरची मान्यता दिली होती.
पण दुसऱ्या कोरोना लाटेत इतर तालुके व इतर जिल्ह्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांच्या गावातील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊस फुल्ल झाली असल्याने या वेगवेगळ्या गावातून अनेक पॉझिटिव्ह रुग्ण चार-पाच दिवसांपासून माजलगावात उपचारासाठी येत आहेत. यामुळे या ठिकाणचेही खासगी कोविड सेंटर हाऊस फुल्ल झालेली आहेत.
येथील शासकीय कोरोना सेंटरमध्ये शनिवारी दुपारपर्यंत १६० रुग्ण उपचार घेत असून दोन ठिकाणी या रुग्णांची सोय करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन रुद्रवार यांनी दिली.
येथील यशवंत हाॅस्पिटलमध्ये ६० बेडला मान्यता असून याठिकाणी शनिवारी दुपारपर्यंत ३५ रुग्ण उपचार घेत असून दररोज या ठिकाणी तीन ते चार रुग्ण हे इतर तालुका व जिल्ह्यातून येत असल्याची माहिती डॉ. यशवंत राजेभोसले यांनी दिली.
माजलगाव शहर व तालुक्यातून अनेक रुग्ण औरंगाबाद, पुणे,जालना या ठिकाणी आतापर्यंत उपचारासाठी गेले होते. गेल्यानंतर उपचारासाठी त्यांना १ ते ५ लाखापेक्षा ही जास्त रक्कम मोजावी लागली होती. परंतु या ठिकाणी अल्पदरात रुग्णांना सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
आमच्याकडे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारुर, गेवराई तर जालना जिल्ह्यातून देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. आमच्या सेंटरला ५० बेडची मान्यता असून हे शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरले आहे.
डॉ. श्रेयश देशपांडे, देशपांडे हाॅस्पिटल