राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:25+5:302021-02-05T08:24:25+5:30
माजलगाव : येथील सिंदफणा नदीवर एक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या मध्यभागी भगदाड पडले व ...

राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक सुरू
माजलगाव : येथील सिंदफणा नदीवर एक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या मध्यभागी भगदाड पडले व खालच्या बाजूनेदेखील प्लास्टर तुटून गज उघडे पडले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने २० दिवसांनंतर आता हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
माजलगाव शहरातून ६१ कल्याण - विशाखापट्टणम व ५४८ सी खामगाव -पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्ग जातात. एक ते दीड वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग ६१च्या ठेकेदार कंपनीने या पुलाचे काम केले होते. या पुलावरून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक महिने कोरोनाकाळात यावरून वाहतूक बंदच होती. असे असताना या पुलाला ८ जानेवारीच्या दरम्यान अनेक ठिकाणी तडे गेले व २-३ ठिकाणी चक्क खड्डे पडले होते. त्यामुळे तत्काळ येथील वाहतूक बंद करून ती जुन्या पुलावरून वळवण्यात आली होती. तब्बल २० दिवस या पुलावरील वाहतूक बंद करून जुन्या पुलावरून वळवण्यात आली होती. या दरम्यान पुलाच्या वरील व खालील दोन्ही बाजूंची दुरुस्ती करण्यात आली व गुरुवारी सायंकाळी नवीन पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यान, पूल दुरुस्ती करण्यात आली असली तरी एका वर्षाच्या आत करोडो रुपये खर्च केलेल्या पुलाला तडे गेल्यामुळे एकूण कामाबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे. तर येथील ५० वर्षे जुना पूल अद्यापही मजबूत व तग धरून आहे. या पुलानेच सावरले. मात्र, या नव्या पुलाला इतक्या लवकर तडे कसे गेले, याची चौकशी करून सदर कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.