सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST2021-02-24T04:34:41+5:302021-02-24T04:34:41+5:30
बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी ...

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली
बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील जवळपास वर्षभरापासून ही सिग्नल प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीची ठिकाणं असलेल्या बार्शीनाका ते साठे चौक, त्यांनंतर सुभाष रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नका या परिसरात सिग्नल लावण्यात आलेले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून ही सर्व सिग्नल प्रणाली बंद आवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी कायम असते, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहेत. सिग्नल सुरु असल्यानंतर या रोडवरील पॉईंटवर एक पोलीस कर्मचारी पुरेसा असतो. मात्र, आता एका पॉईंटवर किमान ३ पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असतात.
सिग्नल नसल्यामुळे वाहतू कोंडी झाल्यावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना देखील जास्तीचे श्रम करावे लागतात. त्यामुळे सिग्नल प्रणाली सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी कर्तव्यावर असतात, सिग्नल सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, सिग्नल सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यावहार करण्यात आला आहे.
कैलास भारती वाहतूक पोलीस प्रमुख
प्रतिक्रिया
शहरातील सिग्नलची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लगात आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरु करावेत.
कुलदीप करपे स्वाभिमानी शेतकरी संघटना
प्रतिक्रिया
वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, लाखों रुपये दुरुस्तीवर खर्च करून देखील सिग्नल प्रणाली बंद आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱीस्तरावर चौकशी करावी व यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी
राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड संघटना बीड
प्रतिक्रिया
मुख्य बाजारपेठात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल सुरु तत्काळ सुरु करणे गरजेचे आहे.
अशोक जगताप, पालसिंगण